संपादक -गणेश जाधव,उपसंपादक -रोहित माने.
दि.21 जून 2026.
मुंबई : पवनराजे निंबाळकर आणि त्यांच्या गाडीचे चालक समद काझी यांच्या २० वर्षांपूर्वीच्या हत्या प्रकरणाचा बहुप्रतिक्षित निकाल आज शनिवारी लागला. प्रकरणातील मुख्य आरोपी आणि राज्याचे माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह अन्य आरोपींची न्यायालयाने पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली.
विशेष न्यायालयाचे न्यायाधीश आर. एस. नावंदर यांनी पोलिसांच्या तपासावरील त्रुटीवर बोट ठेवून माफीचा साक्षीदार आणि पवनराजे यांच्या पत्नी आनंदीदेवी यांच्या साक्षीवर निकालात अनेक प्रश्न उपस्थित केले. दोन दिवसांपूर्वी राजकीय भूमिका बदललेल्या ओमराजे निंबाळकर यांना हा सर्वांत मोठा धक्का होता.
पवनराजे हत्याकांड प्रकरणात न्यायालयाने सर्व आरोपींची मुक्तता का केली, याबाबत न्यायालयाने काय निरीक्षण नोंदवले?
१) माफीच्या साक्षीदाराच्या जबाबातील गंभीर विसंगती
माफीच्या साक्षीदाराने वारंवार आपले जबाब बदलले असून, त्याच्या कथनात अनेक विरोधाभास आहेत.
घटनेनंतरच्या प्रवासाच्या ४ वेगवेगळ्या कथा
त्याने मुंबईतून बाहेर पडण्याबाबत चार वेगवेगळ्या कथा सांगितल्या (उदा. कधी बोरिवलीहून श्रीनाथजी, कधी अहमदाबाद, कधी मित्राकडे जाणे, तर कधी शाळेत राहून मद्यपान केले आणि नंतर लग्नाला गेल्याचे सांगितले). बोरिवलीहून गाडी पकडल्याचे तो म्हणतो, मात्र प्रत्यक्षात तो ट्रॅव्हल्सचा स्टॉप कांदिवली येथे आहे.
गाडी आणि घटनास्थळाचे वर्णन
आरोपींनी गाडी कुठे लावली यावर पंचनामा आणि साक्षीदाराचा जबाब यात तफावत आहे. पंचनाम्यात गाडी रस्त्याच्या उजव्या बाजूला ढिगाऱ्याला टेकून असल्याचे म्हटले आहे, तर जबाबात डाव्या बाजूचा उल्लेख आहे. तसेच तिथे उतार (स्लोप) नसल्याचेही समोर आले.
शूटरला पैसे आणि हत्यारांची खरेदी ?
शूटरला यूपीमध्ये भेटून २० लाखांपैकी २.५ लाख दिल्याचे त्याने सांगितले. मात्र एका जबाबात आरोपी क्रमांक ७ ला तर दुसऱ्या जबाबात आरोपी क्रमांक ९ ला पैसे दिल्याचा उल्लेख आहे. तसेच बिहारमधील सीवानला जाऊन बंदूक घेतल्याचीही एक वेगळीच ‘रंगीत’ कथा त्याने सांगितली.
नागपूर आणि लातूरच्या फेऱ्यांबाबत विसंगती
ठाण्यात इंडिका कार खरेदी करून लातूरला गेल्याचे, तर दुसऱ्या कथेत डोंबिवली आणि तिसऱ्या कथेत लातूरहून पुणे-डोंबिवली केल्याचे म्हटले आहे, ज्याला कोणताही ठोस आधार नाही.
२)पुराव्यांचा अभाव आणि तांत्रिक त्रुटी ?
१) सीडीआर (CDR) सिद्ध करण्यात अपयश: आरोपींचे संभाषण ज्या पीसीओ किंवा फोनवरून झाले, त्याचा कॉल डिटेल्स रेकॉर्ड (CDR) कोर्टात सिद्ध करता आला नाही.
२) मोबाईल जप्त न करणे: तपास करताना आरोपींचे मोबाईल जप्त करण्यात आले नाहीत. सरकारी पक्षाने त्यावेळी CDR नव्हते असे म्हटले, तरीही किमान मोबाईल नंबर मिळवणे गरजेचे होते, जेणेकरून कोण कोणाच्या संपर्कात होते हे स्पष्ट झाले असते.
३) गाडीचे इंजिन आणि चॅसी नंबरमधील तफावत: गुन्ह्यात वापरलेल्या गाडीचे लोकेशन, रंग सिद्ध झालेला नाही. इंजिन आणि चॅसी नंबरमध्ये तफावत असल्याने मोठा संभ्रम निर्माण झाला.
४) गाडीच्या रंगाबाबत संशय: गाडी पूर्णपणे जळून खाक झाली असताना तपास अधिकाऱ्यांनी पंचनाम्यात रंग ‘हिरवा’ कसा लिहिला, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. जुने कागदपत्रे पाहून हा रंग लिहिल्याचे समोर आले.
५) बेवारस दुचाकीचा तपास नाही: कळंबोली पोलीस ठाणे परिसरात मिळालेल्या पंजाब पासिंगच्या बेवारस दुचाकीचा या प्रकरणाशी काय संबंध होता, याचा तपास पोलिसांनी केला नाही.
३. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटीबाबत संशयास्पद दावे ?
१) माफीच्या साक्षीदाराने दावा केला होता की, त्याने बंदूक घेण्यापूर्वी आर. आर. पाटील (पद्मसिंह पाटील यांच्याऐवजी बहुधा ‘आबा’ किंवा संदर्भातील नाव असावे, मात्र जबाबात पद्मसिंह पाटील व राकेश मारिया असा उल्लेख आहे आणि तत्कालीन वरिष्ठ पोलीस अधिकारी राकेश मारिया यांची भेट घेतली होती आणि त्यांना स्कॉचची बॉटल दिली होती.
२) मात्र, राकेश मारिया यांनी अशी कोणतीही भेट झाली नसल्याचे आणि बॉटल मिळाली नसल्याचे स्पष्ट नाकारले. सरकारी पक्षाने यावर सीसीटीव्ही तपासणे किंवा मारिया यांना उलटतपासणीत प्रश्न विचारणे आवश्यक होते, जे केले गेले नाही.
४) आर्थिक स्थिती आणि माफीचा साक्षीदार बनण्यामागचा हेतू ?
१) आर्थिक स्थैर्य- माफीचा साक्षीदार हा मोठा व्यावसायिक होता, त्याची मोठी मालमत्ता आणि अनेक फ्लॅट्स होते. त्याचा कोणताही व्यवसाय डबघाईला आलेला नव्हता. त्यामुळे केवळ ५० हजार रुपयांसाठी तो एवढ्या मोठ्या गुन्ह्यात सामील होईल, हे तार्किकदृष्ट्या पटणारे नाही.
२) अडकून पडल्याने घेतलेला निर्णय: सर्व आरोपी जामिनावर बाहेर आले होते आणि केवळ तो एकटाच जेलमध्ये होता. आपल्याला अडकवून ठेवले आहे या भावनेतून त्याने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर ‘माफीचा साक्षीदार’ होण्यासाठी अर्ज केला, ज्यामुळे संपूर्ण प्रक्रिया संशयाच्या भोवऱ्यात आली.
३) धमकावून घेतलेला कबुली जबाब: त्याने स्वतः आधी कबुली जबाब दिला आणि नंतर तो नाकारला. पोलिसांनी मारहाण केली, एन्काउंटरची आणि कुटुंबाला संपवण्याची धमकी दिली, म्हणून जबाब दिल्याचा आरोप त्याने केला.
न्यायालयाचा अंतिम निष्कर्ष: फौजदारी कायद्यानुसार केवळ संशयाचा फायदा घेऊन कोणालाही दोषी ठरवता येत नाही. गुन्हा सिद्ध करण्यासाठी ठोस आणि एकमेकांना पूरक असणारे पुरावे आवश्यक असतात. या खटल्यात माफीच्या साक्षीदाराची साक्ष पूर्णपणे विसंगत ठरल्याने आणि इतर परिस्थितीजन्य पुरावे सिद्ध न झाल्याने न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.






