संपादक -गणेश जाधव, उपसंपादक -रोहित माने.
दि.23 जून 2026.
लोणावळ्यातील प्रसिद्ध लोहगड किल्ल्यावरून पडून झालेल्या व्यावसायिक तरुण केतन अग्रवाल यांच्या मृत्यूप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली असून हा अपघात नसून पूर्वनियोजित कट रचून करण्यात आलेली हत्या असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.
या प्रकरणी केतन यांच्या होणाऱ्या पत्नीवर आणि तिच्या मित्रांवर खुनाचा आरोप ठेवण्यात आला असून लोणावळा ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत केतन अग्रवाल हे नामांकित उद्योजक विशाल अग्रवाल यांचे सुपुत्र होते. त्यांचा विवाह पुण्यातील मार्केटयार्ड परिसरातील मसाल्यांचे मोठे व्यापारी गोयल कुटुंबातील कन्या सिया गोयल हिच्याशी निश्चित झाला होता. दोन प्रतिष्ठित व्यावसायिक कुटुंबांचा हा विवाहसोहळा अत्यंत भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आला होता. जयपूर येथे लग्नाचे आयोजन करण्यात आले होते आणि वऱ्हाडासाठी तब्बल दोन विमानांचीही बुकिंग करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
मात्र या लग्नासाठी सिया गोयल तयार नसल्याचे तपासात समोर आले आहे. लग्नाबाबत नाराजी असल्याने तिने केतन अग्रवाल यांना कायमचे वाटेतून दूर करण्याचा कट रचल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. यासाठी तिने आपल्या एका जवळच्या मित्राची मदत घेतली. नियोजनानुसार केतन यांना लोणावळ्यातील लोहगड किल्ल्यावर नेण्यात आले. तेथे योग्य संधी साधून त्यांना खोल दरीत ढकलण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेनंतर सुरुवातीला हा ट्रेकिंगदरम्यान घडलेला दुर्दैवी अपघात असल्याचे मानले जात होते. मात्र लोणावळा ग्रामीण पोलिसांनी मोबाईल कॉल रेकॉर्ड, लोकेशन डेटा, संबंधितांच्या हालचाली आणि इतर तांत्रिक पुराव्यांचे विश्लेषण करून तपास पुढे नेला. या तपासातून मृत्यूमागे पूर्वनियोजित कट असल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
या प्रकरणामुळे पुणे, पिंपरी-चिंचवड आणि व्यावसायिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. एका आलिशान आणि चर्चेतील विवाहसोहळ्याआधीच घडलेल्या या कथित हत्याकांडामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून या प्रकरणातील सर्व संबंधितांची कसून चौकशी करण्यात येत आहे. तसेच हत्येचा कट नेमका कसा रचण्यात आला, त्यात आणखी कोणाचा सहभाग होता का, याचाही शोध घेतला जात आहे.








