जेजुरी नगरपरिषद विजयाच्या जल्लोषाला गालबोट; भंडारा उधळताना भीषण आग, १६ जण जखमी


संपादक – गणेश जाधव, प्रतिनिधी – रोहित माने

जेजुरी:- जेजुरी नगरपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाच्या जल्लोषाला रविवारी दुपारी भीषण आगीमुळे गालबोट लागले. विजयानंतर जेजुरी गडाच्या पायथ्याशी भंडाऱ्याची उधळण सुरू असताना अचानक आगीचा भडका उडाला.या दुर्दैवी घटनेत नवनियुक्त नगरसेवकांसह १६ जण भाजले असून, त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.

जेजुरी नगरपरिषदेवर माजी आमदार संजय जगताप यांची सत्ता उलथवून लावत अजित पवारांच्या राष्ट्रवादीने वर्चस्व प्रस्थापित केले. नगराध्यक्षपदाचे उमेदवार जयदीप बारभाई यांच्यासह १७ नगरसेवक निवडून आल्याने कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह होता. विजयी उमेदवार गडाच्या पहिल्या पायरीजवळ खंडेरायाचा आशीर्वाद घेण्यासाठी आले असता, तिथे फटाक्यांची आतषबाजी आणि भंडाऱ्याची उधळण एकाच वेळी सुरू होती. याच दरम्यान भंडाऱ्याने अचानक पेट घेतल्याने एकच पळापळ झाली.

भंडाऱ्याची उधळण होत असताना आगीचा मोठा लोळ उठल्याने सर्वांनाच धक्का बसला. या घटनेत १६ जण होरपळले असून, जखमींमध्ये काही नवनिर्वाचित नगरसेवकांचाही समावेश आहे. या आगीमागे ‘भेसळयुक्त भंडारा’ कारणीभूत असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. भंडाऱ्यात मिसळलेल्या ज्वलनशील केमिकलमुळे फटाक्यांच्या ठिणगीने रौद्र रूप धारण केल्याची चर्चा असून, यामुळे जेजुरीतील भेसळयुक्त भंडाऱ्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

अजित पवारांची रणनीती यशस्वी, पण…

अजित पवारांनी जयदीप बारभाई यांना पक्षात घेऊन खेळलेली खेळी यशस्वी ठरली आणि राष्ट्रवादीने स्पष्ट बहुमत मिळवले. मात्र, या दणदणीत विजयाचा आनंद साजरा करत असतानाच ही दुर्घटना घडल्याने जेजुरी शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. जखमींना तातडीने खाजगी आणि सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.


22
कृपया वोट करा

जनसामान्यांचा आवाजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!