संपादक -गणेश जाधव, उपसंपादक -रोहित माने.
दि.22 जून 2026.
महाराष्ट्राच्या राजकारणात ‘ऑपरेशन टायगर’मुळे खळबळ माजली असतानाच, शिवसेना (यूबीटी) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील जाहीर सभेतून केंद्रीय गृहमंत्री अमित शाहआणि पक्षाशी बंडखोरी करणाऱ्या ६ खासदारांवर अत्यंत आक्रमक आणि बोचरी टीका केली आहे.
शिवसेनाप्रमुख एकच होऊन गेले, दुसरा कोणी होऊच शकत नाही आणि लोक ते कधी स्वीकारणारही नाहीत. तू तुझ्या औकातीत राहा, शिवसेनाप्रमुख कोण हे तुझ्यासारखा उपरा ठरवू शकत नाही,” अशा अत्यंत कडक शब्दांत ठाकरेंनी अमित शाह यांना सुनावले.
उद्धव ठाकरे यांच्या ‘यूबीटी’ गटातील ९ पैकी ६ खासदारांनी पुन्हा एकदा बंडखोरीचे निशाण फडकवले आहे. यामध्ये नागेश अष्टीकर आणि ओमराजे निंबाळकर यांच्यासह ६ खासदारांनी लोकसभा अध्यक्षांकडे स्वतंत्र गट स्थापन करून शिंदे गटात जाण्याची तयारी केली आहे. यावर बोलताना उद्धव ठाकरे भावूक आणि आक्रमक झालेले पाहायला मिळाले. “शिवसैनिकांनी रक्ताचं पाणी करून तुम्हाला मशालीवर निवडून दिलं होतं. आता जिथे जिथे ही गद्दारी झाली आहे, त्या त्या मतदारसंघात मी स्वतः जाऊन जनतेची, मतदारांची माफी मागणार आहे,” अशी मोठी घोषणा ठाकरेंनी केली.
अमित शाह यांच्या ‘त्या’ विधानाचा खरपूस समाचार
शनिवारी कोल्हापूरच्या सभेत अमित शाह यांनी एकनाथ शिंदे यांची ‘शिवसेनाप्रमुख/अध्यक्ष’ म्हणून ओळख करून दिली होती आणि तीच खरी शिवसेना असल्याचे म्हटले होते. यावर पलटवार करताना ठाकरे म्हणाले, “तुमच्या भाजपमध्ये कोणीही उठतो आणि त्याला अध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसवले जाते. भाजपला कोणताही अध्यक्ष चालतो. पण शिवसेनाप्रमुख फक्त आणि फक्त वंदनीय बाळासाहेब ठाकरे हे एकच होऊन गेले, दुसरा होणे नाही! आज तुझ्या बुडाखाली खुर्ची आहे म्हणून लोक तुला घाबरतात.”
“भाजपला आम्ही बोट धरून मोठं केलं, पण…”
काँग्रेसचा दाखला देत उद्धव ठाकरेंनी भाजपच्या छुप्या खेळीवर कडाडून टीका केली. “आम्ही २५-३० वर्षे काँग्रेससोबत राजकीय संघर्ष केला, पण त्यांनी कधी आमचा पक्ष चोरण्याचा किंवा शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला नाही. पण ज्या भाजपला आम्ही बोट धरून मोठं केलं, ती भाजप आज दुसऱ्यांची पोरं चोरून, फोडून स्वतःचं घर भरत आहे. स्वतःचं काही कर्तृत्व नसलेले हे लोक दुसऱ्यांचे खासदार फोडून स्वतःच्या दिल्लीतील खुर्च्या बळकट करण्याचा प्रयत्न करत आहेत,” असा टोला ठाकरेंनी लगावला.
ज्यांना लढायचंय त्यांनी समोरून लढा!
२०१९ च्या निवडणुकीचा संदर्भ देत ठाकरे म्हणाले, “आज जे लोक उड्या मारत आहेत, ते २०१९ मध्ये नरेंद्र मोदींचा चेहरा आणि बाळासाहेबांच्या आशीर्वादावर निवडून आले होते. मी असे म्हणत नाही की ते माझ्या चेहऱ्यावर निवडून आले. पण आज हे उपरे नवीन शोध लावत आहेत. मात्र, माझ्या शिवसैनिकांचे ‘आई जगदंबेचे सुरक्षा कवच’ माझ्यासोबत आहे. ज्यांना लढायचे आहे त्यांनी समोरून मैदानात येऊन लढावे,” असे खुले आव्हानही उद्धव ठाकरेंनी या सभेतून दिले. ६ खासदारांच्या बंडखोरीच्या या मोठ्या राजकीय भूकंपाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंच्या या आक्रमक पवित्र्याने महाराष्ट्रातील राजकारण कमालीचे तापले आहे.








