बारामती पोरकी झालेली वाटली, असे मित्र पुन्हा मिळत नाहीत; दादांच्या आठवणीत उद्धव ठाकरे भावूक


संपादक – गणेश जाधव, प्रतिनिधी – रोहित माने

 

आज (23 फेब्रुवारी) विधानसभेत अजितदादांच्या शोकप्रस्तावावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांच्या आत्म्यास शांति लाभो म्हणताना उद्धव ठाकरे भावूक झाल्याचे दिसून आले. महाराष्ट्राने एक उमदं नेतृत्व गमावलंय. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, आर. आबा आणि आता अजित दादा. महाराष्ट्र ज्यांच्याकडून अपेक्षा करतो ती माणसं अचानक निघून जातात हे राज्याचे दुर्दैव आहे. अशी माणसं पुन्हा पुन्हा होत नाहीत, असे मित्र पुन्हा मिळत नाहीत, असे ते म्हणाले.

आपल्या कर्तृत्वाने सर्वांना उत्तरे दिली

उद्धव ठाकरे म्हणाले की, दादांनी कधी त्यांच्याबद्दल माझ्याकडे देखील कधी असं नाही म्हटलं की, आता काय करायचं, एवढं सगळं माझ्यावर आरोप करत आहेत. त्यांनी त्या सगळ्या आरोपांना आपल्या कामातून उत्तर दिलं. त्यांनी अशा पद्धतीने कामातून उत्तर दिले की, ज्यांनी आरोप केले होते त्यांनी सुद्धा त्यांना सहकारी म्हणून स्वीकारलं. अनेकदा आरोपांमुळे एखादी व्यक्ती बदनाम होते, पण दादांनी डगमगून न जाता आपल्या कर्तृत्वाने सर्वांना उत्तरे दिली.

दुसरी सकाळ महाराष्ट्राला चटका देणारी होती

त्यांनी सांगितले की, आजपर्यंत नेहमी सभागृहात दिसणारे अजित दादा आज दिसत नाही ही खंत आपल्या सगळ्यांच्या मनात आहे. माझ्या कारकिर्दीची सुरुवात ही अजित दादांच्या पक्षाच्या आणि त्यांच्या विचारधारणेच्या विरोधातली होती. आम्ही कधी एकत्र येऊ असं ध्यानीमनी सुद्धा वाटलं नव्हतं. दोन सकाळ अशा होत्या त्यातली एक सकाळ ही महाराष्ट्राला त्यांच्या कृतीने धक्का देणारी होती आणि दुसरी सकाळ ही महाराष्ट्राला चटका देणारी होती, अंतकरणाला चटका देणारी होती.

बारामती पोरकी झालेली मला वाटली

ते म्हणाले की, बारामतीत फिरताना ते उत्साहात तिथला कायापालट दाखवत होते. पण दुर्घटनेनंतर मध्यरात्री मी जेव्हा तिकडे गेलो, तेव्हा ती बारामती पोरकी झालेली मला वाटली. त्यांची कामाची शिस्त जबरदस्त होती. 11 वाजताची वेळ असेल तर गाडी दारात उभी असायची. त्यांच्यासमोरचे टेबल, पेन, कागद हे व्यवस्थित काटकोनात असायचे. ही सवय शिवसेना प्रमुखांना सुद्धा होती, असे ते म्हणाले.

प्रशासकीय कामकाजामध्ये मला खंबीर पाठिंबा

ते पुढे म्हणाले की, अजित दादांसारखा एक भरोसेमंद उत्तम दिलदार केवळ सहकारीच नव्हे तर मित्र मी गमावला. प्रशासकीय कामकाजामध्ये मला खंबीर पाठिंबा होता, आधार होता. एवढा विषयाचा सखोल अभ्यास करणारा सहकारी अभावानेच आढळेल. एका मोठ्या वृक्षाच्या सावलीतून बाहेर पडून स्वतःची ओळख निर्माण करणं हे फार अवघड असतं. त्यातले एक अजित दादा होते. लॉकडाऊनमध्ये मंत्रालय बंद होतं पण महाराष्ट्र बंद नव्हता. अर्थचक्र थांबते की काय अशी परिस्थिती होती, त्याही वेळेला या माणसाने तो समतोल साधला.


21
कृपया वोट करा

जनसामान्यांचा आवाजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!