काळजाच्या तुकड्याला वाचवण्यासाठी आईची शेवटच्या श्वासापर्यंत झुंज; बरगी धरण क्रूझ दुर्घटनेतील हृदय पिळवटून टाकणारे दृश्य


संपादक – गणेश जाधव, प्रतिनिधी – रोहित माने

दि.2 मे – मध्य प्रदेशातील जबलपूर जवळील बरगी धरण येथे घडलेल्या क्रूझ बोट अपघाताने एक हृदयद्रावक आणि काळीज पिळवटून टाकणारी कहाणी समोर आली आहे.

बोट उलटल्यानंतर सुरू झालेल्या गोंधळात प्रत्येक जण स्वतःचा जीव वाचवण्यासाठी झुंज देत होता. त्या क्षणी एक चिमुकला घाबरून आपल्या आईला घट्ट बिलगला… आणि आईनेही त्याला तितक्याच मायेने कवटाळलं. दिल्लीहून फिरण्यासाठी आलेल्या मरीना मैसी यांनी लाईफ जॅकेटच्या आधाराने आपल्या मुलगा त्रिशानला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पाण्याच्या लाटांशी झुंज देत त्यांनी मुलाला आपल्या छातीशी घट्ट धरून ठेवले, जणू काही त्या प्रत्येक क्षणी मृत्यूशी लढत होत्या.

मात्र निसर्गाच्या त्या भीषण रूपासमोर त्यांचा प्रयत्न अपुरा ठरला. आई स्वतः बाहेर पडू शकली नाही… पण शेवटच्या श्वासापर्यंत तिने आपल्या लेकराला सोडलं नाही. मृत्यू आल्यानंतरही दोघे एकमेकांना बिलगलेलेच राहिले. बचाव पथकाने जेव्हा त्यांचे मृतदेह बाहेर काढले, तेव्हाही ते तस्सेच एकमेकांच्या मिठीत होते. हे दृश्य पाहून उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू तरळले आणि प्रत्येकाच्या मनात एकच विचार उमटला -आईचं प्रेम शेवटच्या क्षणापर्यंत साथ सोडत नाही.

या दुर्घटनेत आतापर्यंत ९ जणांचा मृत्यू झाला असून अजूनही काही जण बेपत्ता आहेत. या घटनेने संपूर्ण देश हादरला असून, त्या आई-मुलाच्या नात्याने सर्वांच्या मनावर खोल ठसा उमटवला आहे.

 


21
कृपया वोट करा

जनसामान्यांचा आवाजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!