अर्थसंकल्पातील नीरा-कऱ्हा उपसा सिंचन प्रकल्प केवळ घोषणा- खासदार सुप्रिया सुळे यांची टीका; म्हणाल्या…


संपादक – गणेश जाधव, प्रतिनिधी – रोहित माने

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात नीरा-कऱ्हा उपसा सिंचन प्रकल्पाची घोषणा केली आहे. मात्र, या योजनेसाठी निधीची तरतूद केलेली नाही. त्यामुळे ही केवळ घोषणाच असल्याचे स्पष्ट होत आहे,’ अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.

हा प्रकल्प कधी आणि कसा पूर्ण करणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात नीरा-कऱ्हा उपसा सिंचन प्रकल्पाबाबत केलेल्या घोषणेबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी समाज माध्यमावरून टीका केली आहे. ‘ही निव्वळ घोषणा ठरू नये, ठोस निधीची तरतूद करून काम सुरू होण्याच्या दृष्टीने आखणी करण्यात यावी. त्यामुळे बारामती आणि पुरंदर तालुक्यातील अवर्षणग्रस्त नागरिकांत संभ्रम राहणार नाही,’ असे त्यांनी म्हटले आहे.

‘बारामती आणि पुरंदर तालुक्यातील अवर्षणग्रस्त गावांतल्या शेतजमिनी ओलिताखाली आणणे तसेच पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी नीरा व कऱ्हा नदीच्या पाण्याची महत्त्वाकांक्षी उपसा सिंचन योजना ही दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वप्न होते. या योजनेच्या माध्यमातून या भागातील गावांवरील ‘जिरायती भाग’ हा शिक्का कायमस्वरूपी पुसून टाकणे शक्य आहे. त्यासाठी अजित पवार हे प्रयत्नशील होते,’ असे खासदार सुळे यांनी नमूद केले आहे.

‘बारामती तालुक्यातील कण्हेरी या ठिकाणी २४ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या जाहीर सभेत अजित पवार यांनी या योजनेचा उल्लेख केला होता. या योजनेसाठी १ हजार कोटी रुपयांची तरतूद करत असून त्या माध्यमातून सुमारे अडीच टीएमसी पाणी साठविण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर केला. त्यात त्यांनी विविध प्रकल्पांची घोषणा केली. नीरा-कऱ्हा उपसा सिंचन प्रकल्पाचाही उल्लेख केला.

मात्र, त्यासाठी निधीच्या तरतुदींचा उल्लेख केला नाही,’ असे खासदार सुप्रिया सुळे यांनी नमूद केले. ‘राज्यातील अन्य सिंचन प्रकल्पांच्या घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी निधीसहीत जाहीर केल्या आहेत. त्यात बारामती आणि पुरंदर तालुक्यासाठी अतिशय महत्त्वाच्या असलेल्या नीरा-कऱ्हा उपसा सिंचन प्रकल्पाबाबत मात्र त्यांनी निव्वळ घोषणाच केल्याचे दिसत आहे. त्यामुळे शासनाची या प्रकल्पाबाबत नेमकी काय भूमिका आहे, याबाबत जनतेमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.’ असेही त्यांनी म्हटले आहे.

 


21
कृपया वोट करा

जनसामान्यांचा आवाजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!