बारामतीत हॉस्पिटलमध्ये 15 लाखांची चोरी; अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल


संपादक – गणेश जाधव, प्रतिनिधी – रोहित माने

बारामती शहरातील भिगवण रोडवरील संगवी टाऊनशिप परिसरात असलेल्या “प्रिझ्मा आय केअर” हॉस्पिटलमध्ये अज्ञात चोरट्याने धाडसी चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे.

मुख्य दरवाजाजवळील ग्रॅनाईटची चौकट फोडून हॉस्पिटलमध्ये प्रवेश करत चोरट्याने ड्रॉवर उचकटत तब्बल 15 लाख रुपयांची रोख रक्कम लंपास केल्याचे समोर आले आहे.

ही घटना 13 मार्च 2026 रोजी पहाटे सुमारे 6.20 वाजण्याच्या सुमारास घडल्याची माहिती पोलिसांनी दिली. घटनेची माहिती मिळताच बारामती शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. या प्रकरणी बारामती शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 97/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम 331(3) आणि 305 नुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चोरट्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून परिसरातील CCTV फुटेज तपासले जात असून तांत्रिक तपास आणि विशेष पथकाद्वारे शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर बारामती शहर पोलिसांनी व्यापारी, हॉस्पिटल, क्लिनिक तसेच व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात रोख रक्कम ठेऊ नये, CCTV आणि अलार्म सिस्टीम बसवावी, तसेच संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे, असे आवाहन केले आहे.

कोणतीही संशयास्पद माहिती मिळाल्यास नागरिकांनी बारामती शहर पोलीस स्टेशन किंवा आपत्कालीन क्रमांक 112 वर संपर्क साधावा, असे आवाहन प्रभारी पोलीस निरीक्षकांनी केले आहे.


21
कृपया वोट करा

जनसामान्यांचा आवाजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!