बारामती सांगता सभेत प्रफुल पटेल यांचे विधान; पवार साहेबांचा निर्णय योग्य, रोहित पवारांवर सूचक टोला


बारामती – (ता.21)राज्यातील दोन मतदारसंघांत होत असलेल्या पोटनिवडणुकांपैकी बारामती विधानसभा मतदारसंघात आज महायुतीची जाहीर सांगता सभा उत्साहात पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या या सभेला मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि नागरिकांनी हजेरी लावली.

सभेत महायुतीतील सर्वच प्रमुख नेत्यांनी भाषण करत सुनेत्रा पवार यांना विक्रमी मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले. या वेळी सुप्रिया सुळे यांनीही सभेला उपस्थिती लावून अजित पवारांच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांनी अजित दादांच्या आई आशा काकींना भेटल्याचे सांगत भावनिक वातावरण निर्माण केले.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांनी आपल्या भाषणात अजित पवार यांच्या कार्याचा उल्लेख करत बारामतीतील जनतेने त्यांचा विक्रम मोडत सुनेत्रा पवार यांना विजयी करावे, असे आवाहन केले. हीच अजित दादांना खरी श्रद्धांजली ठरेल, असेही त्यांनी नमूद केले. तसेच, सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला संपूर्ण महाराष्ट्रात बळकटी देण्याचा प्रयत्न करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिनिधी म्हणून उदय सामंत आणि रामदास आठवले यांचीही उपस्थिती होती. यावेळी शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत बोलताना प्रफुल पटेल म्हणाले की, प्रकृतीची काळजी घेत त्यांनी बारामती दौरा टाळण्याचा योग्य निर्णय घेतला आहे. त्यांनी आपले आशीर्वाद सुनेत्रा पवार यांच्यासोबत असल्याचे कळवले असून, त्यांच्या वतीने सुप्रिया सुळे या सभेला उपस्थित राहिल्या आहेत.

तसेच, कोणताही नेता पक्षाच्या उमेदवाराच्या समर्थनार्थ प्रचारासाठी येत असेल, तर त्याचे स्वागतच आहे, असे सांगत प्रफुल पटेल यांनी रोहित पवार यांच्यावर नाव न घेता भाष्य केले. “शेवटी त्या त्यांच्या काकू आहेत,” असे म्हणत त्यांनी टोला लगावला.एकूणच, बारामतीतील पोटनिवडणुकीचा प्रचार आज जोरदार वातावरणात संपन्न झाला असून, आता सर्वांचे लक्ष निकालाकडे लागले आहे.


21
कृपया वोट करा

जनसामान्यांचा आवाजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!