संपादक – गणेश जाधव, प्रतिनिधी – रोहित माने
पुणे – (ता.28)राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या कथित विमान अपघातातील निधनाला तीन महिने पूर्ण होऊनही तपासात ठोस निष्कर्ष समोर आलेला नसल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी आज पुण्यातील सीआयडी कार्यालयात हजेरी लावत तपास यंत्रणांवर नाराजी व्यक्त केली.
माध्यमांशी संवाद साधताना रोहित पवार यांनी या प्रकरणात काही धक्कादायक आरोप करत तपासाला वेगळा अँगल दिला. भोंदू बाबा अशोक खरात याच्या नावाचा उल्लेख करत त्यांनी 27 ते 29 जानेवारी दरम्यान त्याच्या बँक खात्यात झालेल्या मोठ्या आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. याशिवाय, बारामतीतील एका स्थानिक राजकीय नेत्याचा या प्रकरणाशी संबंध असू शकतो, असा संशयही त्यांनी व्यक्त केला.
रोहित पवार यांनी दावा केला की, अजित पवार यांच्या निधनापूर्वी काटेवाडी, बारामती आणि मुंबईतील देवगिरी बंगल्याबाहेर काही संशयास्पद पूजा करण्यात आल्या होत्या. काटेवाडीत एका झाडाला बकरीची पूजा करून टांगण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. या घटनांमागे नेमका काय उद्देश होता, याची सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
“आम्ही अंधश्रद्धांवर विश्वास ठेवत नाही, मात्र या सर्व प्रकारांमागे कोणते षडयंत्र आहे का, हे शोधणे गरजेचे आहे,” असेही ते म्हणाले. तसेच या प्रकरणातील कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR) आपल्या हाती लागल्याचा दावा करत, त्यातून पुढे मोठे खुलासे होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, तपास यंत्रणांकडून या प्रकरणाची पुढील चौकशी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.







