संपादक -गणेश जाधव, उपसंपादक -रोहित माने.
दि.28 जून 2026.
आयोध्या – अयोध्येतील राममंदिरात काही कर्मचारी सीसीटीव्हीला चकविण्याचा प्रयत्न करून नोटांच्या बंडलमधून पैसे काढून ते कपड्यांमध्ये लपवत होते. मात्र, ही कृष्णकृत्ये सीसीटीव्हीमध्ये कैद झालीच आणि चोरांचे पितळ उघडे पडले.
मोजणी होत असल्याने वाटेत अतिरिक्त नोटा काढून घेतल्या जात. त्यामुळे कागदोपत्री आणि प्रत्यक्ष जमा होणारी रक्कम जुळत असे, असे तपासात उघड झाले आहे.
बँक कर्मचाऱ्यांचीही होणार चौकशी
राममंदिर प्रकरणात आरोपी अनुकल्प मिश्रा, लवकुश मिश्रा, अविनाश शुक्ला, टिन्नू यादव आदींची चौकशी सुरू असून लवकुश मिश्रा यांच्या घरातून सुमारे १० लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. या गैरव्यवहारात काही बँक कर्मचाऱ्यांचाही सहभाग असल्याचा संशय असून त्या दिशेनेही एसआयटी पथक तपास करत आहे.
भविष्यात गैरप्रकार होणार नाही याची दक्षता घेणार – ट्रस्ट
या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून भाविकांचा विश्वास पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी ट्रस्ट कटिबद्ध असल्याचे श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंद देव गिरी यांनी स्पष्ट केले. गिरी यांनी निवेदनात म्हटले की, अलीकडील घडामोडींमुळे ट्रस्टचे विश्वस्त हादरले असून अत्यंत व्यथित आहेत. खासगी व्यक्तींनी मंदिराला दान केलेल्या चांदीच्या विटा, दागिने व इतर मौल्यवान वस्तूंची योग्य नोंदींसह सुरक्षित जपणूक केली आहे.
दोषींना कठोर शिक्षा व्हावी, तसेच समाजविघातक आणि धर्मविरोधी शक्तींना सनातन धर्माची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न यशस्वी होऊ दिला जाणार नाही, असेही त्यांनी नमूद केले. गेल्या काही दिवसांत जे गैरप्रकार झाले तशा घटना पुन्हा घडणार नाहीत, यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जातील, असे आश्वासनही त्यांनी दिले. सत्य समोर येईल आणि प्रभू रामावरील भक्तीचा प्रवाह अखंड सुरू राहील, असा विश्वासही व्यक्त केला.
देणगी गैरव्यवहार लज्जास्पद : प्रियांका
अयोध्या / वायनाड : अयोध्येतील राममंदिरासाठी जमा झालेल्या देणगीसंदर्भात झालेले गैरव्यवहार हे दुर्दैवी तसेच लज्जास्पद आहेत. या प्रकरणाची उत्तर प्रदेश सरकारने सखोल चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेसच्या सरचिटणीस व केरळमधील वायनाडच्या खासदार प्रियांका गांधी यांनी शनिवारी केली. त्यांनी सांगितले की, राममंदिरात देणगी संकलित करून ती सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी असलेल्यांचीही चौकशी होणे आवश्यक आहे.
वायनाड येथे त्यांनी सांगितले की, देशभरातील भाविकांना, महिलांनी आपल्या बचतीतून, तर गरिबांनीही श्रद्धेने अयोध्येतील राममंदिराला देणग्या दिल्या होत्या. ही केवळ उद्योगसमूहांची देणगी नसून सामान्य नागरिकांनी विश्वासाने दान केलेली रक्कम आहे. त्यामुळे या निधीचे संरक्षण करण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणेची होती.
काँग्रेस नेते दिग्विजयसिंह यांनी श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपतराय यांच्या अटकेची मागणी केली आहे.








