संपादक -गणेश जाधव, उपसंपादक -रोहित माने.
दि. 27 जून 2026.
MAHA TET paper leak latest news : देशभरात गाजलेल्या ‘नीट’ (NEET) पेपरफुटीच्या प्रकरणाची धग अजून शांत झालेली नसतानाच आता महाराष्ट्रात पुन्हा एकदा पेपरफुटीचे सत्र सुरू झाले आहे. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHA TET) चा पेपर फुटल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
ठाण्यात टीईटी परीक्षेचा पेपर लीक झाल्याचे उघडकीस आले आहे, त्यामुळेच खबरदारीचा उपाय म्हणून उद्या (२८ जून) होणारी ही परीक्षा तडकाफडकी रद्द करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; परीक्षा ऐनवेळी रद्द
राज्यभरातून लाखो उमेदवारांनी या परीक्षेसाठी जय्यत तयारी केली होती. परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनाने कडक नियमावलीही जाहीर केली होती. मात्र, ऐन परीक्षेच्या पूर्वसंध्येलाच ठाण्यातून पेपर लीक झाल्याची माहिती समोर आल्याने राज्यभरातील विद्यार्थ्यांमध्ये आणि कार्यरत शिक्षकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
पुढील परीक्षा कधी?
सरकारी रुग्णालयात बाळाचा जन्म झाल्यास मिळणार सोन्याची अंगठी; ‘या’ सरकारने सुरू केली अनोखी योजना
ऐनवेळी परीक्षा रद्द झाल्यामुळे आता ही परीक्षा पुन्हा कधी घेतली जाणार? याकडे सर्व उमेदवारांचे आणि शैक्षणिक वर्तुळाचे लक्ष लागले आहे. अद्याप नवीन तारीख जाहीर झालेली नाही. महाराष्ट्रात पुन्हा एकदा पेपरफुटीचे सत्र सुरू झाल्याने विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, परीक्षा पारदर्शक वातावरणात कधी होणार, असा संतप्त सवाल परीक्षार्थी विचारत आहेत.








