संपादक -गणेश जाधव, उपसंपादक -रोहित माने.
दि.25 जून 2026.
कन्नड – कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना आणि औषध निर्मितीचा परवाना नसताना लोकांच्या जिवाशी खेळून बोगस औषधोपचार व विक्री केली जात असल्याच्या तक्रारीवरून कन्नड तालुक्यातील मुंगसापूर येथील ब्रम्ह आश्रमावर अन्न व औषध प्रशासन (FDA) आणि आरोग्य विभागाने संयुक्त छापा टाकला.
मुंगसापूर (जेहुर) येथील ‘ब्रह्मर्षी जनार्दन स्वामी आश्रम’ या ठिकाणी बुधवारी (ता.२४) रोजी ही धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत रुग्णांचे नाव, आजार आणि घेतलेले शुल्क यांची नोंद असलेली ५ महत्त्वाची रजिस्टर जप्त करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंगसापूर येथील मुकुंद शंकर पाटील ऊर्फ ‘महामंडळेश्वर मुक्तानंदगिरी बापुजी महाराज’ यांच्या या आश्रमात कोणत्याही परवान्याशिवाय औषध उत्पादन आणि विक्री केली जात असल्याची तक्रार प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार आज बुधवारी सकाळी ११:३० वाजता अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) सहाय्यक आयुक्त (औषधे) व्ही. व्ही. नागरे, अधिकारी एम. बी. पाटणे, कन्नडचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. योगेश सोळुंके, सहाय्यक प्रशासन अधिकारी हरिनाम कोल्लमवार आणि पंचायत समितीच्या विस्तार अधिकारी सुशीला बाबुल, डॉ. प्रदिप कांबळे यांच्या पथकाच्या अधिकाऱ्यांनी पंचांसमक्ष आश्रमात प्रवेश केला. पुढील कायदेशीर कारवाईसाठी जप्त केलेली ५ रजिस्टर तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतली आहेत.
पोलिसांना बोलावून तोडले कुलूप!
छाप्यादरम्यान आश्रमात सर्वप्रथम रवींद्र रावसाहेब गोडसे हा व्यक्ती आढळून आला. तो येथे गोशाळा व पूजेचे काम पाहत असल्याचे समोर आले. आश्रमाच्या तीन मजली मुख्य इमारतीच्या खोल्यांना कुलूप असल्याने मॅनेजर संजय राजेंद्र फोलाणे याला बोलावून घेण्यात आले. पहिल्या मजल्यावरील तपासणीत रुग्णांची माहिती असलेली दोन रजिस्टर आढळून आली. दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावर जाणाऱ्या जिन्याला लोखंडी गेटचे कुलूप होते. मॅनेजरने चावी देण्यास नकार दिल्याने अखेर कन्नड ग्रामीण पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलीस निरीक्षक एन. बी. गिते व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत लोखंडी छन्नीने कुलूप तोडण्यात आले. येथील संगणक कक्षातून आणखी २ रजिस्टर आणि १ डायरी जप्त करण्यात आली, ज्यामध्ये रुग्णांचे नाव, पत्ता आणि आकारलेल्या शुल्काची नोंद आहे.
‘हर्बल’ औषधाची बाटली जप्त
आश्रमाच्या मॅनेजरने दावा केला की, चार महिन्यांपूर्वीच सर्व औषधे केरळमधील ‘SNA’ नावाच्या कंपनीला परत पाठवली आहेत; मात्र याबाबत तो कोणतीही कागदपत्रे सादर करू शकला नाही. दुसऱ्या मजल्यावरील तपासणीत पथकाला ‘महामंडळेश्वर हर्बल SS प्योर हर्बल’ (MRP ३००/-) अशी छापील लेबल असलेली आणि उत्पादनाचा पत्ता ‘ब्रह्मर्षी जनार्दन स्वामी आश्रम, मुंगसापूर’ अशी नोंद असलेली एक बाटली मिळून आली. ही बाटली पुढील प्रयोगशाळा तपासासाठी जप्त करण्यात आली आहे.
‘महाराज’ सीए, पण वैद्यकीय पदवी गायब; २८ दिवसांपासून हिमालयात!
आश्रमाचे प्रमुख मुकुंद शंकर पाटील ऊर्फ मुक्तानंदगिरी महाराज यांच्या शैक्षणिक पात्रतेबाबत मॅनेजरकडे विचारणा केली असता, महाराजांचे ‘सीए’ (CA) चे शिक्षण झाले असल्याचे सांगण्यात आले. मात्र, त्यांच्याकडे वैद्यकीय व्यवसायाशी संबंधित कोणतीही पदवी किंवा कागदपत्रे आढळून आली नाहीत. महाराज सध्या कुठे आहेत, असे विचारले असता ते २८ दिवसांपूर्वी तपश्चर्येसाठी हिमालयात गेले असून त्यांच्याकडे मोबाईल नसल्याचे मॅनेजरने सांगितले. ते पुढील ४ दिवसांत परतण्याची शक्यता असल्याचेही सांगण्यात आले.








