संपादक -गणेश जाधव, उपसंपादक -रोहित माने.
दि. 30 जून 2026.
बारामती : अर्थखाते आपल्याकडे नसल्यामुळे विकासकामे थांबली असल्याचे बोलले जाते. मात्र, तसे काही नाही. ‘अजितदादा’ आपल्याला सोडून गेल्यावर, त्यावेळी अर्थसंकल्प जवळ असल्यामुळे ‘सीएम’ साहेबांनी ते खाते त्यांच्याकडे ठेवले.
काही दिवसांपूर्वी पार्थदादा, सुनेत्रावहिनींची आमची याबाबत चर्चा झाली. ‘सीएम’ साहेब म्हणाले की, लवकरच अर्थखाते आपल्याकडे येईल, तसेच ‘दादां’ची विकासकामांची स्वप्न पूर्ण होतील, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते जय पवार यांनी केले आहे.
बारामती पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित आजी माजी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचा कृतज्ञता मेळाव्यात ते बोलत होते. जय पवार पुढे म्हणाले, दादांसारखे काम करण्याचा माझा प्रयत्न आहे. नुकतीच काही अधिकाऱ्यांसह दुबई येथील तज्ज्ञांसमवेत बारामतीच्या विमानतळाला भेट देत पाहणी केली. ‘लोकसभा निवडणुकीच्या काळातच ‘दादां’समवेत येथील या विमानतळाबाबत चर्चा झाली होती. दादांसह अनेक व्हीआयपी या विमानतळावर येतात, त्यामुळे निवडणूक झाल्यावर हे विमानतळ अधिक सुरक्षित आणि चांगले करण्याचे ‘दादां’च्या मनात होते. त्यानुसार ‘दादां’नी विमानतळ ‘एमआयडीसी’च्या ताब्यात देखील घेतले. कारण बारामतीचा विकास कधीही थांबता कामा नये, असे ‘दादां’चे स्वप्न होते. माझेदेखील तेच स्वप्न आहे. बारामतीत लवकरच दोन परदेशी कंपन्या आणून रोजगारनिर्मितीचा प्रयत्न असून, याबाबत बोलणी सुरू असल्याचे पवार म्हणाले.
रेवती सुळे यांच्या विवाहात केलेल्या ‘डान्स स्टेप’वरून ‘ट्रोल’ करण्यात आले होते. यावेळी पवार यांनी संबंधित ट्रोलर्सदेखील सुनावले, ते म्हणाले, दोन डान्स स्टेपवरून ‘कमेंट’मध्ये काही जण चुकीचे बोलले. त्या लोकांना मला उत्तर द्यायचे आहे. राजकारण सगळे बाजूला आणि कुटुंब वेगळे आहे, अशी ‘दादां’चीच शिकवण आहे. त्यामुळे ‘कमेंट्स’ने काहीही फरक पडत नाही. मला माझ्या जनतेची काळजी महत्त्वाची वाटते, असे पवार म्हणाले. २६ जानेवारीला ‘दादां’ची भेट झाली होती. त्यावेळी ‘दादां’नी शेवटची निवडणूक असल्याचे सांगितले होते. ३ वर्षे शांततेत जे काही असतील काम करू, सुट्टीवर जाऊ, असे दादा म्हणाले होते.
मात्र, २८ तारखेला आपले सगळ्यांचे जीवन बदलले. मात्र, माझे, पार्थदादा आणि वहिनींचे जीवन खूप वेगाने बदलले. जबाबदाऱ्या वाढल्या, आम्हाला कधीही ही वेळ येईल, असे वाटले नव्हते. मात्र, सर्वांमध्ये पोकळी दिसून आली. सर्वांना आधाराची गरज होती. त्यामुळे बारामती आणि राज्यातील जनतेसाठी झटायचे ठरवले. त्या पद्धतीनेच आम्ही काम करतोय, असे पवार म्हणाले. अजित पवार यांचे स्मारक पुणे, मुंबईत करण्याची देखील मागणी होती. मात्र, कुटुंबीय आणि निकटवर्तीयांसमवेत चर्चेनंतर ‘दादां’चे बारामतीत स्मारक उभारण्याचा आम्ही निर्णय घेतल्याचे पवार म्हणाले. यावेळी बारामती पंचायत समितीचे सभापती किरण तावरे, उपसभापती शुभांगी आगवणे, गटनेते बाबा चोरमले, उपगटनेते नितीन काकडे आदी उपस्थित होते.








