संपादक – गणेश जाधव, प्रतिनिधी – रोहित माने
बारामती – असोसिएशन ऑफ इंडियन युनिर्व्हसिटिज, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अखिल भारतीय आंतरविद्यापीठ बेसबॉल स्पर्धेचा शनिवारी (ता.३) बारामतीत प्रारंभ झाला. येथील टी. सी. महाविद्यालयाच्या मैदानावर ही स्पर्धा रंगणार असून देशभरातून मुला मुलींचे ११४ संघ बारामतीत दाखल झाले आहेत.
स्पर्धेचे उद्घाटन फलटण एज्युकेशन सोसायटीचे सचिव संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते व अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे सचिव मिलिंद शाह (वाघोलीकर) यांच्या अध्यक्षतेखाली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. सुदाम शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी प्राचार्य डॉ. अविनाश जगताप, विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉ. सुनीलदत्त लोखंडे, अनेकांतच्या जनरल गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य राहुल शाह (वाघोलीकर), सोहम शाह, ओम शाह, मनोहर कुंजीर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे साहाय्यक कुलसचिव शिवाजी उतेकर, उपप्राचार्य डॉ. योगिनी मुळे, डॉ. अरुण मगर, रजिस्ट्रार अभिनंदन शाह, शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ. गौतम जाधव व अशोक देवकर उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष जवाहर शहा (वाघोलीकर) यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. बेसबॉल स्पर्धेत मुलांचे ६३ व मुलींचे ५१ संघ सहभागी झाले आहेत. क्रीडास्पर्धेसाठी महाविद्यालय व विद्यापीठाने उत्तम वातावरण निर्माण केले असून सर्व खेळाडूंनी सर्वोत्तम कामगिरी करावी, अशी अपेक्षा डॉ. सुदाम शेळके यांनी व्यक्त केली.









