चव्हाणांच्या ‘त्या’ विधानानं निवडणूक फिरली, भाजपने लातूर गमावलं, काँग्रेस ची सत्ता


संपादक – गणेश जाधव, प्रतिनिधी – रोहित माने

लातूर – निवडणूक प्रचारात, सभांमध्ये केलेली वादग्रस्त विधानं किती महागात पडू शकतात, याची प्रचिती भाजपला लातूरमध्ये आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केलेल्या एका विधानामुळे लातूर महापालिका निवडणुकीत सत्ताधारी पक्षाला धक्का बसला आहे.

राज्यातील बहुतांश महापालिकांमध्ये भाजपनं मुसंडी मारलेली असताना लातूरमध्ये भाजपचा धुव्वा उडाला आहे. काँग्रेस-वंचित बहुजन आघाडीनं लातूरमध्ये विजय साकारला आहे.

लातूर महापालिकेत एकूण ७० जागा आहेत. बहुमतासाठी ३६ चा आकडा गाठणं महत्त्वाचं आहे. काँग्रेस आणि वंचितनं मोठी मुसंडी मारत ४१ जागा जिंकल्या आहेत. तर भाजपला केवळ २० जागांवर समाधान मानावं लागलं आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ १ जागा मिळाली आहे. तर शरद पवारांच्या काँग्रेसला खातंही उघडता आलेलं नाही. लातूरमधील सत्ता भाजपनं गमावली आहे. गेल्या निवडणुकीत भाजपनं ३६ जागा जिंकल्या होत्या. पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं होतं.

लातूरमध्ये प्रचार करताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी काँग्रेसचे दिवंगत नेते आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याबद्दल केलेल्या विधानानं मोठा वाद झाला. विलासराव देशमुख यांच्या आठवणी पुसल्या जातील, असं विधान चव्हाण यांनी केलं होतं. त्याचे तीव्र पडसाद लातूरसह राज्यभरात उमटले. काँग्रेसच्या नेत्यांनी या विधानावरुन चव्हाण यांच्यासह भाजपचा खरपूस समाचार घेतला.

लोकांसाठी जगलेल्या माणसांची नावं मनावर कोरलेली असतात, ती पुसली जात नाहीत, अशा शब्दांत विलासराव देशमुख यांचे पुत्र रितेश देशमुख यांनी चव्हाण यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली. चव्हाण यांच्या वक्तव्यामुळे लातूरमध्ये भाजप बॅकफूटवर गेला. लोकनेते असलेल्या देशमुख यांच्याबद्दल लातूरच्या जनतेत आदराची भावना आहे. त्यामुळे चव्हाण यांचं विधान भाजपला महागात पडलं आहे.

रविंद्र चव्हाण यांच्या विधानाचे तीव्र पडसाद उमटले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूरमध्ये जाऊन सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. विलासरावांबद्दल आम्हाला नितांत आदर आहे. आमची लढाई काँग्रेसशी आहे, असं फडणवीस म्हणाले. महाराष्ट्राच्या जडणघडणीत विलासरावांचा मोठा वाटा आहे आणि हे सांगताना माझ्या मनात कोणताही संकोच नाही, असं म्हणत फडणवीस यांनी चव्हाण यांची चूक सुधारण्याचा प्रयत्न केला.


21
कृपया वोट करा

जनसामान्यांचा आवाजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!