संपादक – गणेश जाधव, प्रतिनिधी – रोहित माने
बारामती – (ता 22)बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत गुरुवारी (ता. २३) मतदान होणार आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे मतदानासाठी उपस्थित राहणार नाहीत.
त्यांची प्रकृती ठीक नसल्याने डॉक्टरांनी त्यांना सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला दिला आहे. शरद पवार यांनीच सोशल मीडियात पोस्ट करत मंगळवारी ही माहिती दिली होती. त्यावर आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
सुनेत्रा पवार या बारामती मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार आहेत. त्यांच्याविरोधात कोणत्याही प्रमुख पक्षाचा उमेदवार रिंगणात नाही. त्यामुळे ही लढत एकतर्फी ठरली आहे. असे असूनही मताधिक्य किती असणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे. त्यामुळे अधिकाधिक मतदान व्हावे, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रयत्न केले जात आहेत.
दरम्यान, सुनेत्रा पवार यांनी शरद पवार मतदानाला येणार नसले तरी त्यांचे आशीर्वाद लाखमोलाचे असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सोशल मीडियात पोस्ट करत म्हटले आहे की, प्रकृती अस्वास्थ्यामुळे आदरणीय पवार साहेब बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतदानास उपस्थित राहू शकणार नाहीत. मात्र त्यांचे आशीर्वाद माझ्यासाठी आणि बारामतीकरांसाठी लाखमोलाचे आहेत.
बारामतीसह महाराष्ट्राच्या व देशाच्या विकासात आदरणीय साहेबांचे योगदान प्रेरणादायी आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय दादांनीही विकासात्मक राजकारणाची समृद्ध परंपरा जपली. आदरणीय साहेबांनी केलेल्या आवाहनाला बारामतीकर नक्कीच उत्स्फूर्त प्रतिसाद देतील. बारामतीची जनता विकासाच्या विचारांशी जोडलेली आहे आणि तीच दिशा पुढेही कायम राहील. आदरणीय साहेबांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी, हीच मनःपूर्वक प्रार्थना, असे सुनेत्रा पवारांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
काय म्हणाले होते शरद पवार?
शरद पवार यांनी सोशल मीडियात पोस्ट करत म्हटले होते की, पोटनिवडणुकीसाठी बारामती येथे येऊन आतापर्यंतच्या प्रघातानुसार मतदान करण्याचे मी ठरवले होते. दुर्दैवाने माझी प्रकृती बिघडल्याने मला मुंबईत रुग्णालयात दाखल व्हावे लागले. डॉक्टरांनी मला उपचार आणि सक्तीची विश्रांती या कारणास्तव मुंबईबाहेर जाण्यास मनाई केली आहे. त्यामुळे अत्यंत नाईलाजास्तव मतदानाचा हक्क बजावण्यापासून मला वंचित रहावे लागत आहे, हे मी अत्यंत व्यथित आणि खेदपूर्ण अंत:करणाने सांगू इच्छितो.








