संपादक – गणेश जाधव, प्रतिनिधी – रोहित माने
बारामती – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या शिस्तीसाठी आणि स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. मात्र, आज पुण्यात एका वेगळ्याच प्रसंगाने त्यांच्या संतापाचा प्रत्यय कार्यकर्त्यांना आला.
पुण्यातील ‘बारामती हॉस्टेल’ येथे पोहोचल्यानंतर कार्यालय बंद असल्याचे पाहून अजित पवारांचा पारा चढला आणि त्यांनी उपस्थित पीए व कर्मचाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली.
अजित पवार जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची तयारी करत आहेत. आज नियोजित भेटीसाठी पुण्यातील बारामती हॉस्टेल येथे आले होते. यावेळी त्यांच्याआधीच कार्यकर्त्यांचा मोठा फौजफाटा आणि भेटीसाठी आलेले नागरिक तिथे आलेले होते. मात्र, अजित पवार तिथे पोहोचले तरी हॉस्टेलच्या कार्यालयाला कुलूप होते. राज्याचा उपमुख्यमंत्री दारात उभा असूनही कार्यालय उघडले नसल्याने पवारांना काही काळ बाहेरच ताटकळत उभे राहावे लागले.
कार्यालय बंद असलेले पाहून अजित पवार संतप्त झाले. त्यांनी तात्काळ आपल्या पीएला बोलावून विचारणा केली. “कार्यालय उघडून कार्यकर्त्यांना आत बसायला द्यायचे की नाही? मग कशाला बंद ठेवले आहे? चावी आणायला त्रास होतोय का…” अशा कडक शब्दांत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. दादांचा रुद्रावतार पाहून उपस्थित कार्यकर्त्यांची आणि कर्मचाऱ्यांची मोठी धावपळ उडाली. अखेर घाईघाईने कार्यालय उघडण्यात आले आणि त्यानंतर पुढील कामकाज सुरू झाले.









