संपादक – गणेश जाधव, प्रतिनिधी – रोहित माने
बारामती – तांदूळवाडी (ता. बारामती) येथे एका कार्यक्रमादरम्यान जेवण वाढताना काढलेला व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केल्याच्या कारणावरून १८ वर्षीय तरुणावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी बारामती तालुका पोलिसांनी दोन मुख्य आरोपींना अटक केली आहे.
या घटनेनंतर दोन्ही गटांकडून परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या असून परिसरात खळबळ उडाली आहे.
१८ जानेवारी रोजी सायंकाळी ८ वाजता सार्थक लक्ष्मण अंबुरे (वय १८, रा. तांदुळवाडी) हा भैरवनाथ मंदिरात पालखीतील भाविकांसाठी जेवण वाढत असताना त्याचा व्हिडिओ गावातील एका तरुणाने काढून इन्स्टाग्रामवर टाकला. तो व्हिडिओ डिलीट करण्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला.
यानंतर पप्पू शितोळे याने सार्थकला काम असल्याचे सांगून मंदिराच्या मागील बाजूस नेले. तेथे गणेश सुभाष जाधव, अभिजीत शेळके, अरुण जाधव व अन्य काही इसम आधीच थांबलेले होते. त्यांनी शिवीगाळ करत सार्थकला जबरदस्तीने यश शितोळे यांच्या घराकडे नेले. तेथे त्याला खाली पाडून लोखंडी गज व लाथा- बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली.
या वेळी गणेश जाधव याने पिस्तूल काढून जीवे मारण्याची धमकी दिली, तर पप्पू शितोळे याने प्रकार कुणाला सांगितल्यास गंभीर परिणाम होतील, अशी धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या हल्ल्यात सार्थकच्या पाठीवर गंभीर दुखापत झाली. भीतीमुळे त्याने तत्काळ तक्रार दिली नव्हती. मात्र, दुसऱ्या दिवशी दुखापतीचा त्रास वाढल्याने त्याने आईसह बारामती तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार गंभीर दुखापतीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी मुख्य आरोपी गणेश सुभाष जाधव (वय ३४) व पप्पू शितोळे (वय ३४, दोघेही रा. तांदुळवाडी) यांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.
दरम्यान, या घटनेशी संबंधित दुसऱ्या बाजूकडूनही तक्रार दाखल झाली असून एका अल्पवयीन मुलाच्या डोक्याला कोयत्याने दुखापत झाल्याप्रकरणी सार्थक अंबुरे, आकाश अंबुरे, बापू अंबुरे, पोपट अंबुरे व लखन अंबुरे (सर्व रा. तांदुळवाडी) यांच्याविरुद्ध गंभीर दुखापतीचा गुन्हा नोंदविण्यात आला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस उपनिरीक्षक युवराज पाटील तसेच पोलीस कर्मचारी सुरेंद्र वाघ, भारत खारतोडे, जितेंद्र शिंदे, मनोज पवार, दादा दराडे व आफ्रिन शेख यांनी केली. पुढील तपास बारामती तालुका पोलीस करीत आहेत.









