बारामती बाजार समितीत मका हमीभाव खरेदी केंद्र सुरू


संपादक – गणेश जाधव, प्रतिनिधी – रोहित माने

बारामती – बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जळोची उपबाजार आवारात मका हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. बाजार आवारात लिलावामध्ये मका दर हमीभावापेक्षा कमी मिळत आहे. त्यामुळे शेतकरी संघटनांनी हमीभाव केंद्र सुरू करण्याची मागणी केली होती.

केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत (एमएसपी) खरेदी योजनेअंतर्गत हंगाम २०२५-२६ साठी मका खरेदीसाठी ऑनलाइन नाव नोंदणी सुरू आहे. ज्या मका उत्पादक शेतकऱ्यांनी अद्याप ऑनलाइन नोंदणी केलेली नाही, त्यांनी २८ फेब्रुवारीपर्यंत नावनोंदणी करावी, असे आवाहन बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

ऑनलाइन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना एसएमएसद्वारे मका आणण्याची तारीख कळविण्यात येणार आहे. त्याच दिवशी शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर मका आणावा. मका हमीभाव प्रति क्विंटल २४०० रुपये असून, प्रति एकर ९.५० क्विंटल मका खरेदी करण्यात येणार आहे.

शासनाने ठरवून दिलेल्या अटींनुसार आवश्यक कागदपत्रे सादर करूनच नाव नोंदणी करावी लागणार आहे. हे खरेदी केंद्र जळोची उपबाजार येथील भाजी मार्केट आवारातील गोदामात सुरू असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव अरविंद जगताप यांनी दिली.

दरम्यान बाबालाल काकडे नीरा कॅनॉल संघामार्फत ऑनलाइन नोंदणी सुरू असून आतापर्यंत २२० शेतकऱ्यांनी नाव नोंदणी केली आहे. शासनाने दिलेल्या निकषांनुसारच मका खरेदी केली जाणार असल्याने शेतकऱ्यांनी मका पूर्णपणे वाळलेली व स्वच्छ करूनच खरेदी केंद्रावर आणावी, असे आवाहन नीरा कॅनॉल संघाचे अध्यक्ष सतीश काकडे यांनी केले आहे.


21
कृपया वोट करा

जनसामान्यांचा आवाजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!