संपादक – गणेश जाधव, प्रतिनिधी – रोहित माने
बारामती – बारामती विमानतळापासून काही अंतरावर 28 जानेवारी रोजी सकाळी झालेल्या विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाले. त्यानंतर 29 जानेवारी रोजी अजित पवारांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
अजित पवारांच्या निधनाला चार दिवस झाले असले तरी संपूर्ण महाराष्ट्रावर अद्यापही शोककळा पसरली आहे. राज्यभर बॅनर लावत अजित पवारांना श्रद्धांजली वाहण्यात आली. खासकरून बारामतीत अजित पवारांच्या कार्यकर्त्यांनी आणि त्यांच्या चाहत्यांनी बॅनर लावत त्यांना श्रद्धांजली वाहिली. मात्र बातामतीतील बॅनरबाजीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी भावूक प्रतिक्रिया दिली आहे.
रोहित पवार यांनी बारामतीत अजित पवारांसंदर्भात लावण्यात आलेले जुने बॅनर X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केले आहेत. हे बॅनर पोस्ट करताना रोहित पवार यांनी म्हटले की, बारामतीचं दुसरं नाव म्हणजे शरद पवार आणि अजितदादा…! आजपर्यंत या दोघांपैकी ज्याला सत्तेचं पद मिळायचं, त्यांच्या अभिनंदनाचे बारामतीत मोठमोठे बॅनर दिसायचे. उपमुख्यमंत्रीपदी निवड किंवा भावी मुख्यमंत्री अशा ठसठशीत अक्षरात अजितदादांचा देखणा आणि राजबिंडा फोटो असायचा. ते पाहून मन आनंदाने भरून यायचं आणि अभिमानही वाटायचा, पण आज? डोंगराएवढ्या दुःखापुढं आज पहिल्यांदाच ना पदाचं कौतुक आहे, ना आनंदाचा जल्लोष. गळ्यात हार घातलेला अजितदादांचा फोटो पाहणं डोळ्यांना सहन होत नाहीय, अशी भावनिक मत रोहित पवार यांनी मांडले आहे.
रोहित पवार म्हणाले की, आज बारामतीत अभिनंदनाच्या जागी श्रद्धांजलीचे बॅनर आहेत, पण हे लावणाऱ्या आणि अजितदादांवर अतीव प्रेम करणाऱ्या सर्वांना माझी हात जोडून विनंती आहे की, अजितदादा हे आपल्यातच होते, आपल्यातच आहेत आणि त्यांच्या कामातून ते कायम आपल्यातच राहणार आहेत. त्यामुळे अजितदादांच्या नावापुढं स्वर्गीय शब्द लावण्याचं जसं धाडस माझ्यात नाही तसं आपणही करू नये, अशी विनंती रोहित पवार यांनी अजित पवारांच्या कार्यकर्त्यांना आणि त्यांच्या चाहत्या वर्गाला केली आहे.









