पहिले बिर्याणी खाल्ली मग कलिंगड…एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, नेमकं झालं काय ?


संपादक – गणेश जाधव, प्रतिनिधी – रोहित माने

मुंबई : (ता .27 )शहरातील पायधुनी परिसरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली असून, मृतांमध्ये दोन अल्पवयीन मुलींचाही समावेश आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

पायधुनीतील घाटी गल्ली परिसरातील मुघल बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या डोकाडिया कुटुंबीयांनी शनिवारी रात्री नातेवाईकांसोबत जेवण केले होते. जेवणामध्ये त्यांनी बिर्याणी खाल्ली आणि त्यानंतर कलिंगड खाल्ल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, काही तासांतच कुटुंबातील सर्व सदस्यांना उलटी, जुलाब, चक्कर आणि पोटदुखीचा त्रास सुरू झाला. सुरुवातीला त्यांनी फॅमिली डॉक्टरकडे उपचार घेतले, परंतु प्रकृती अधिकच खालावत गेल्याने डॉक्टरांनी त्यांना तात्काळ जेजे रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला.

रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचार सुरू असताना प्रथम 16 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. त्यानंतर काही तासांतच 13 वर्षीय दुसऱ्या मुलीनेही प्राण सोडले. दोन्ही मुलींच्या मृत्यूनंतर काही वेळातच आई-वडिलांचाही मृत्यू झाला. या घटनेत अब्दुल्ला डोकाडिया, नसरीन डोकाडिया आणि त्यांच्या दोन मुलींचा मृत्यू झाला असून, या घटनेने संपूर्ण परिसर शोकसागरात बुडाला आहे.

मृत्यूपूर्वी कुटुंबातील एका सदस्याने पोलिसांना दिलेल्या जबाबात त्यांनी सर्वांनी एकत्र बिर्याणी आणि त्यानंतर कलिंगड खाल्ल्याचे सांगितले आहे. मुंबई पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, हा प्रकार फूड पॉइझनिंगमुळे घडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, चारही मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले असून, त्याचा अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.


21
कृपया वोट करा

जनसामान्यांचा आवाजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!