बारामती हादरली! बंद खोलीत ब्लँकेटखाली मृतदेह; 7 दिवसांनंतर उघड झालं विवाहितेसोबत घडलेलं ‘भयानक’ सत्य


संपादक – गणेश जाधव, प्रतिनिधी – रोहित माने

बारामती – बारामती तालुक्यातील सोनगाव गावात एका विवाहित महिलेचा मृतदेह  तिच्या घरात सडलेल्या अवस्थेत आढळून आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

सुजाता स्वप्नील निंबाळकर वय 38 असे मृत महिलेचे नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीती आणि हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणात माहेरच्या नातेवाइकांनी संशय व्यक्त करत थेट सासरच्या घरासमोर अंत्यविधी केल्याने गावात तणाव निर्माण झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुजाता या सोनगाव येथील सासरच्या घरी एकट्याच राहत होत्या. त्यांचे पती नोकरीसाठी पुण्यात राहत असून सासू-सासरे बारामती शहरात वेगळ्या ठिकाणी राहतात. मागील सुमारे 6 ते 7 दिवसांपासून सुजाता कोणाचाही फोन उचलत नव्हत्या. त्यामुळे काळजी वाटल्याने त्यांचे भाऊ आणि इतर नातेवाईक सोनगाव येथे आले. घराचा दरवाजा उघडून आत पाहिले असता सुजाता यांचा मृतदेह पलंगावर आढळून आला. मृतदेहावर ब्लँकेट टाकलेले होते आणि मृत्यू होऊन अनेक दिवस झाल्याने तो सडलेल्या अवस्थेत होता.

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक तपासात पोलिसांनी मृत्यू नैसर्गिक असण्याची शक्यता व्यक्त केली आहे. झोपेत असताना अचानक तब्येत बिघडल्याने त्यांचा मृत्यू झाला असावा आणि घरात कोणी नसल्यामुळे वेळेवर मदत मिळाली नसावी, असा प्राथमिक अंदाज आहे. मात्र मृतदेह झाकलेला असल्याने आणि मृत्यूबाबत माहिती वेळेत न दिल्याने माहेरच्या नातेवाइकांचा संशय वाढला आहे.

या घटनेनंतर सुजाता यांच्या माहेरच्या लोकांनी सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केले. संतापाच्या भरात त्यांनी गावकरी आणि पोलिसांच्या उपस्थितीत सासरच्या घरासमोरच अंत्यविधी करून निषेध व्यक्त केला. या प्रकारामुळे गावात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

पोलीस या संपूर्ण घटनेचा सखोल तपास करत असून शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

 


21
कृपया वोट करा

जनसामान्यांचा आवाजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!