संपादक – गणेश जाधव, प्रतिनिधी – रोहित माने
बारामती – ७ फेब्रुवारीला राज्यात १२ जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत येणाऱ्या १२५ पंचायत समितीसाठी मतदान पार पडले. विविध ठिकाणी मतदान यंत्रात बिघाड, काही ठिकाणी गोंधळ या घटना वगळता शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली.
पुणे जिल्ह्यात सरासरी ७० टक्के मतदान झाले आहे.
मात्र, पवार कुटुंबीयांचा बालेकिल्ला असलेल्या बारामती तालुक्यात मतदारांमध्ये निरुत्साह बघायला मिळाला. यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीत बारामतीमधील मतदारांनी निवडणुकीकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. पुणे जिल्ह्यात सर्वात कमी मतदान बारामती तालुक्यात झाले आहे. अवघे ५४ टक्के मतदान झाले आहे. ऐन जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतच अजित पवार यांना काळाने हिरावून घेतले. परिणामी बारामती तालुक्यावर दुःखाचे सावट होते. यामुळे मतदारांनी निवडणुकीकडे पाठ फिरल्याची चर्चा आहे.
बारामती येथील मतदान केंद्रावर पवार कुटुंबातील सदस्यांनी आवर्जून मतदान केले. मात्र, सामान्य मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवल्याचे दिसते. पुणे जिल्ह्यात वेल्हेमध्ये सर्वाधिक मतदान झाले आहे. सरासरी ७९ टक्के मतदान करण्यात आल्याची नोंद आहे. तर पुणे जिल्ह्यात ७९ टक्के मतदान झाले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.








