बारामती-भिगवण रोडवर लूटमार करणारी ‘पुणेरी टोळी’ पोलिसांच्या ताब्यात


संपादक – गणेश जाधव, प्रतिनिधी – रोहित माने

बारामती – बारामती तालुक्यातील भिगवण-बारामती रोडवर कोयत्याच्या धाकाने प्रवाशांना लुटणाऱ्या टोळीवर पोलिसांनी धाडसी कारवाई करत चार आरोपींना अटक केली आहे. या घटनेमुळे काही दिवसांपासून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र पोलिसांच्या तातडीच्या कारवाईमुळे मोठा गुन्हा उघडकीस आला आहे.

जैनकवाडी फाटा परिसरात 7 फेब्रुवारी रोजी रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. विश्वराजे उर्फ विश्वा चंद्रशेखर पाटील (वय 18) आणि त्यांचे सहकारी कॅरी गाडीतून प्रवास करत असताना 6 ते 7 जणांच्या टोळीने अचानक रस्त्यात अडथळा निर्माण करून वाहन थांबवले. आरोपींनी गाडीच्या काचा फोडत कोयता आणि लोखंडी दांडक्यांचा धाक दाखवून प्रवाशांवर हल्ला केला. या हल्ल्यात फिर्यादीच्या डोक्यावर कोयत्याने वार करण्यात आला आणि मोबाईल, बॅगा, कागदपत्रे व रोख रक्कम असा सुमारे 12 हजार 20 रुपयांचा मुद्देमाल लुटून आरोपी फरार झाले.

घटनेची माहिती मिळताच बारामती तालुका पोलीस ठाणे चे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली. भिगवण, दौंड आणि यवत पोलिसांना सतर्क करण्यात आले. मोटारसायकल आणि रिक्षाच्या मदतीने पळून जाणाऱ्या आरोपींचा केडगाव चौफुला-सुपा रोडवर पाठलाग करण्यात आला. या कारवाईत चार आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकले, तर एक आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून तीन धारदार कोयते, एक बेसबॉल रॉड तसेच चोरीचा काही मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तपासात या टोळीने कुरकुंभ परिसरात पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यावरही हल्ला केल्याचे समोर आले आहे.

ग्रामीण भागात रस्त्यावर अडवून लूटमार करणाऱ्या टोळ्यांविरुद्ध पोलिसांनी वेळेत कारवाई केल्याने नागरिकांमध्ये दिलासा व्यक्त केला जात आहे. रात्रीच्या प्रवासादरम्यान संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.


21
कृपया वोट करा

जनसामान्यांचा आवाजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!