संपादक – गणेश जाधव, प्रतिनिधी – रोहित माने
बारामती – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या झालेल्या दुःखद निधनाच्या पार्श्वभूमीवर, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या निकालादिवशी कोणताही सार्वजनिक जल्लोष न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अशी माहिती हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष दिलीप वाल्हेकर यांनी दिली.
सोमवारी (ता. 9) रोजी होणाऱ्या मतमोजणीदरम्यान कोणत्याही विजयी उमेदवार किंवा कार्यकर्त्यांनी हार, बुके, गुलाल, फटाके, आतषबाजी, घोषणाबाजी, साऊंड सिस्टिम, बेंजो, डीजे आदी प्रकारचा कोणताही जल्लोष करू नये, असे स्पष्ट निर्देश पक्षाकडून देण्यात आले आहेत.
शनिवारी (ता. 7 फेब्रुवारी) रोजी पार पडलेल्या निवडणुकांसाठी अहोरात्र परिश्रम घेतलेल्या सर्व कार्यकर्ते व मतदार बंधू-भगिनींचे पक्षातर्फे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले आहेत. तसेच पुणे जिल्ह्यातील जनतेने अजितदादांच्या विचारांना पाठिंबा दिला असल्याचा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.
दरम्यान, निवडणुकीतील विजय हा अत्यंत शांतपणे, संयमाने व कोणताही सार्वजनिक उत्सव न करता आदरणीय अजितदादा पवार यांना समर्पित करावा, असे आवाहन पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे करण्यात आल्याची माहितीही वाल्हेकर यांनी दिली.








