संपादक – गणेश जाधव, प्रतिनिधी – रोहित माने
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना पुण्यातल्या रुबी हॉल क्लिनिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
त्यांना खोकल्याचा आणि कफचा त्रास होतो आहे. त्यामुळे त्यांना रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान त्यांची प्रकृती कशी आहे? त्यांना काय होतं आहे? हे सांगणारी एक पोस्ट सुप्रिया सुळेंनी लिहिली आहे. तसंच डॉ, लोढा यांनीही शरद पवारांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती दिली आहे.
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं?
शरद पवारांना थकवा आला आहे. त्यांना छातीत कफ झाला आहे त्यांच्या तपासण्या करण्यात आल्या आहेत. शरद पवारांची प्रकृती स्थिर आहे. तपासण्यांचा अहवाल आल्यानंतर आम्ही पुढचा निर्णय घेऊ. शरद पवारांना किती दिवस रुग्णालयात रहावं लागेल याचा निर्णयही या अहवालानंतरच घेतला जाईल. शरद पवारांची प्रकृती आत्ता स्थिर आहे. काळजी करण्यासारखं आत्ता तरी काही नाही. शरद पवार यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलेलं नाही. तर शरद पवार हे प्रायव्हेट रुममध्ये आहेत अशी माहिती रुबी रुग्णालयाचे डॉ. लोढा यांनी माध्यमांना दिली.
सुप्रिया सुळेंची पोस्ट काय?
सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘बाबांना खोकला आहे, छातीत कफ झाला आहे. पाच दिवस त्यांना औषध घ्यायला सांगितलं आहे. बाकी सगळ्या चाचण्या केल्या त्या सामान्य आहेत. तुम्हा सगळ्यांच्या सदिच्छा आणि आधार यासाठी मी तुमची आभारी आहे.’ या आशयाची पोस्ट सुप्रिया सुळेंनी केली आहे.









