बारामतीच्या इतिहासात नवी भर! सिद्धेश्वर मंदिराच्या बांधकामाचे 300 वर्षांपूर्वीचे शिलालेख उघड, मराठा काळातील संस्कृतीचे दर्शन


संपादक – गणेश जाधव, प्रतिनिधी – रोहित माने

सुपे परगण्यास महाराष्ट्राच्या इतिहासात विशेष महत्त्व आहे. सुपे हे भोसले घराण्याला मिळालेली जहागीर ते पेशवे काळापर्यंत अनेक ऐतिहासिक घडामोडींचे केंद्र राहिले आहे.

याच सुप्यातील सिद्‌धेश्वर महादेव मंदिराच्या  बांधकामासंबंधीचे सुमारे ३०० वर्षांपूर्वीचे दोन शिलालेख भीमथडी इतिहास संशोधन संस्थेचे अनिल दुधाणे यांनी उजेडात आणले.

सिद्धेश्वर महादेव मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याच्या प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूस भिंतीवर कोरलेला पहिला शिलालेख सात ओळींचा असून तो देवनागरी लिपीत व मराठी भाषेत आहे. या शिलालेखानुसार शालिवाहन शके १६४२, शार्वरी संवत्सर, म्हणजेच १९ ऑगस्ट १७२० रोजी मौजे सुपे येथील दामाजी माणकेश्वर देशपांडे यांनी श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर उभारले.

या शिलालेखातून दामाजी माणकेश्वर हे त्या काळातील महसुली किंवा लेखाधिकारी वर्गातील प्रतिष्ठित व्यक्ती असल्याचे समजते. तसेच, स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांनी धार्मिक संस्थांना दिलेला आश्रय, १८ व्या शतकातील मंदिरविकासाचा पुरावा या अभिलेखातून मिळतो. मराठा सत्तेच्या प्रारंभीच्या काळातील धार्मिक स्थापत्य, दानसंस्कृती आणि प्रशासन यांचा एकत्रित दस्तऐवज म्हणून हा शिलालेख महत्त्वाचा ठरतो.

मंदिराच्या सभामंडपाच्या प्रवेशद्वारावर कोरलेला दुसरा शिलालेख चार ओळींचा असून तोही देवनागरी लिपीत आहे. या लेखानुसार शालिवाहन शके १६७२, प्रमोद संवत्सर, माघ महिन्यातील कृष्ण पक्ष द्वादशी म्हणजेच ११ फेब्रुवारी १७५१ रोजी महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी दामाजी माणकेश्वर देशपांडे यांनी सभामंडप बांधला.

या शिलालेखात वर्षाचा उल्लेख शशांक पद्धतीने करण्यात आला असून तिथी, वार आणि संवत्सर यांची अचूक सांगड घालण्यात आली आहे. मूळ मंदिरानंतर सुमारे ३० वर्षांनी सभामंडप उभारण्यात आल्याचा पुरावा यातून मिळतो. देशपांडे घराण्याची धार्मिक आश्रयदात्याची भूमिका आणि शैव परंपरेशी असलेली निष्ठा या अभिलेखातून अधोरेखित होते.

या दोन्ही शिलालेखांचे वाचन भीमथडी इतिहास संशोधन संस्थेचे अनिल दुधाणे यांनी केले असून विश्वास देशपांडे यांनी त्यांना सहकार्य केले. भीमथडी इतिहास संशोधन संस्थेच्या माध्यमातून बारामती परिसरातील अनेक शिलालेखांचे संशोधन सुरू असून त्यामुळे स्थानिक इतिहास उजेडात येत असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष विनोद खटके व सचिव मनोज कुंभार यांनी दिली

 


21
कृपया वोट करा

जनसामान्यांचा आवाजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!