भिगवणमध्ये भरदिवसा अपहरण; आई-भावाच्या डोळ्यात मिरची फेकून तरुणीला पळवल..!


संपादक – गणेश जाधव, प्रतिनिधी – रोहित माने

इंदापूर- इंदापूर तालुक्यातील भिगवण परिसरात मंगळवारी दुपारी घडलेल्या धक्कादायक प्रकाराने एकच खळबळ उडाली आहे. दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या २१ वर्षीय तरुणीचे तिच्या आई आणि भावासमोरच अपहरण करण्यात आले.

आरोपींनी प्रथम तिघांच्या डोळ्यात लाल मिरचीची पूड फेकून त्यांना असहाय्य केले आणि त्यानंतर तरुणीला जबरदस्तीने घेऊन पसार झाले.

या प्रकरणी भिगवण पोलिस ठाण्यात झहीर हरून शेख आणि आयान हरून शेख (रा. शेखवस्ती, स्वामी चिंचोली, ता. दौंड, जि. पुणे) या सख्ख्या भावांविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणी आई व भावासोबत दुचाकीवरून भिगवणकडे जात असताना दुपारी सुमारे चारच्या सुमारास संशयितांनी त्यांची गाडी अडवली.

अचानक हल्ला चढवत तिघांच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकली. या प्रकारामुळे आई व भाऊ काही क्षण काहीच पाहू शकले नाहीत. त्याचा फायदा घेत आरोपींनी तरुणीला जबरदस्तीने वाहनात बसवून घटनास्थळावरून पलायन केले. घटनेची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरताच भिगवण शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. अनेक नागरिक आणि हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने पोलिस ठाण्यात दाखल झाले. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला.

घटनेचे गांभीर्य ओळखून अप्पर पोलिस अधीक्षक गणेश बिरादार, दौंड विभागीय पोलिस अधिकारी बापुराव दडस तसेच बारामती विभागाचे अधिकारी सुदर्शन राठोड यांनी भिगवण येथे भेट देत तपासाचा आढावा घेतला. आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली असून जिल्ह्यातील प्रमुख मार्ग व टोल नाक्यांवर नाकाबंदी करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

दरम्यान, अलीकडच्या काळात परिसरात वाढत्या गुन्हेगारी घटनांबाबत नागरिकांत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. अपहृत तरुणीचा लवकरात लवकर शोध घेऊन आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे. पोलिसांकडून तपास सुरू असून पुढील घडामोडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 


21
कृपया वोट करा

जनसामान्यांचा आवाजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!