बारामती- पारवडी मार्गावर दुचाकी व चारचाकीची रात्री धडक! मायलेकी जागीच ठार! पती आणि मुलगा गंभीर जखमी!


संपादक – गणेश जाधव, प्रतिनिधी – रोहित माने

काल रात्री बारामती पारवडी मार्गावर दुचाकी आणि चारचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीवरील पती-पत्नी आणि दोन मुलं गंभीर जखमी झाले. यात पत्नी आणि मुलीचा दुर्दैवीरित्या मृत्यू झाला असून पती आणि मुलगा गंभीर जखमी अवस्थेत आहे.

पाच वर्षाची सानवी मयूर कोकणे व तिची आई रूपाली मयूर कोकणे या दोघींचा या घटनेत दुर्दैवीरित्या मृत्यू झाला असून, मयूर कोकणे व त्यांचा दोन वर्षाचा मुलगा या घटनेमध्ये गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी दवाखान्यात तातडीने हलवण्यात आले आहे. ही घटना काल रात्री उशिरा बारामती पारवडी रस्त्यावर घडली.

दुचाकीवरून कोकणे कुटुंब बारामतीकडून पारवडीच्या दिशेने चालले होते. याच वेळी बारामती कटफळ पारवडी मार्गावर परीट वस्ती लगत खडकी कडून बारामतीच्या दिशेने येणाऱ्या चारचाकी वाहनाची दुचाकीला जोरदार धडक बसली. या घटनेत मायलेकीचा मृत्यू झाला तर ग्रामस्थांनी तातडीने धावपळ करत गंभीर जखमी झालेल्या मयूर कोकणे व त्यांच्या दोन वर्षाच्या मुलाला दवाखान्यामध्ये नेले.

अपघात झाल्यानंतर चारचाकी वाहन चालकाने गाडी तेथेच सोडून पलायन केल्याची प्राथमिक माहिती आहे. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोचून पंचनामा केला व वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली. दरम्यान या घटनेमुळे या रस्त्यावरील वाहतूक किती धोकादायक पातळीवर पोहोचली आहे याचा अंदाज आला असून नागरिकही हतबल झाले आहेत.

 


21
कृपया वोट करा

जनसामान्यांचा आवाजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!