पुण्यात ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा देणारा तरुण अटकेत


संपादक – गणेश जाधव, प्रतिनिधी – रोहित माने

पुणे – पाकिस्तान जिंदाबाद’ अशा घोषणा दिल्यामुळे पुण्यातील झोपडपट्टी परिसरातून एका २० वर्षीय तरूणाला अटक करण्यात आली आहे. संबंधित घोषणांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी अटकेची कारवाई केली.

या घटनेनंतर परिसरातील मुस्लीम कुटुंबांनी सोमवारचा इफ्तार रद्द केला. या परिसरातील काही हिंदू कुटुंबांनीही आरोपी तरूणाच्या कुटुंबाला आधार दिला आहे. सदर तरूणाने मस्करीत टिप्पणी केली होती, अशी भूमिका काही जणांनी व्यक्त केली आहे.

द इंडियन एक्सप्रेसने यासंदर्भात बातमी दिली आहे. २० वर्षांचा तरूण त्याच्या कुटुंबातील एकटा कमावता व्यक्ती आहे. इलेक्ट्रिशियनचे काम करणाऱ्या या तरूणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर या तरुणाला अटक करण्यात आली.

‘तो मुलगा चांगला आहे’, शेजाऱ्यांनी घेतली बाजू

रविवारी सदर तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम १९२ आणि १९६ (१) नुसार दोन गटात शत्रुत्व निर्माण करण्यास प्रोत्साहन दिल्याबद्दल एफआयआर दाखल करण्यात आला आहे. हिंदू शेजाऱ्यांनी सांगितले की, तो चांगला आहे. एका बांधकाम साईटवर काम करत असताना सहकाऱ्यांशी बोलत असतानाचा त्याचा व्हिडीओ चित्रित करण्यात आला होता. यावेळी आरोपी तरूणाने पाकिस्तान जिंदाबाद म्हटले होते.

आरोपीचे कुटुंबिय आण शेजाऱ्यांनी सांगितले की, तरूणाची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. त्याला त्याच्या मित्राने सदर घोषणा देण्यासाठी उद्युक्त केले आणि त्याचा एडिट केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला. त्याने त्याच्या विधानाबद्दल आधीच माफी मागितली आहे.

आरोपी तरूणाच्या वडिलांचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्याचा मोठा भाऊ दिव्यांग आहे. त्यामुळे या तरूणाला शिक्षण अर्धवट सोडून कामावर जावे लागले. बांधकाम साईटवर तो इलेक्ट्रिशियनचे काम करतो. तरूणाची आई घरकाम करते. द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना त्या म्हणाल्या, “व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हाला लक्षात येईल. माझ्या मुलाला तसे बोलण्यास भाग पाडले आहे. त्याच्या विधाचे काय परिणाम होतील, याचा त्याला अंदाजही नाही. तो अजून लहान आहे, त्याने माफी मागितली आहे.”

हिंदू शेजाऱ्यांनी सांगितले की, सदर आरोपी चांगला मुलगा आहे. तो सकाळी कामाला जातो, सायंकाळी आल्यानंतर घरी आईची मदत करतो. जर त्याची वाईट संगत असती तर आम्हीही त्याला शिक्षा द्यावी, असेच म्हणालो असतो. पण तो चांगला मुलगा आहे. त्याच्याकडून अनवधानाने चूक झाली. आमच्या परिसरात हिंदू आणि मुस्लीम सर्व एकत्रच राहतात.

पोलिसांनी काय सांगितले?

पुण्यातील झोन २ चे पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते म्हणाले, सदर तरूण बांधकाम साईटवर काम करत असताना त्याच्या सहकाऱ्याने हा व्हिडीओ चित्रीत केला. व्हायरल व्हिडीओचा तपास केला जात आहे. दरम्यान काही संघटनांनी तक्रार दिल्यानंतर एफआयआर दाखल करून आरोपीला अटक केली आहे.


21
कृपया वोट करा

जनसामान्यांचा आवाजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!