संपादक – गणेश जाधव, प्रतिनिधी – रोहित माने
बारामती – शारदानगर (ता. बारामती) येथून काही दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या २१ वर्षीय विद्यार्थिनीचा मृतदेह शनिवारी (ता. १४) माळेगाव खुर्द- केव्हीके रस्त्यालगत विहिरीत आढळून आला. प्रतीक्षा दत्तात्रेय मेमाणे (हल्ली मुक्काम रा.शारदानगर) असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून, तिने विहिरीत उडी मारून जीवन संपविल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतिक्षा ही शिक्षण घेणारी युवती ९ मार्च रोजी सकाळच्या सुमारास घरातून बाहेर पडली होती. मात्र, दिवसभर उलटूनही ती घरी परतली नव्हती. सुरुवातीला नातेवाइकांनी ओळखीच्या ठिकाणी चौकशी केली, मित्रमैत्रिणींशी संपर्क साधला; परंतु तिचा काहीच मागमूस लागला नाही.
त्यामुळे कुटुंबीयांची चिंता दिवसेंदिवस वाढत गेली. अखेर तिचे वडील दत्तात्रेय नामदेव मेमाणे (हल्ली रा. शारदानगर) यांनी माळेगाव पोलिस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली.
नातेवाईक, मित्रपरिवार आणि गावकऱ्यांनीही विविध भागात शोध घेतला, परंतु ती मिळून आली नाही. दरम्यान, शनिवारी सकाळच्या सुमारास माळेगाव खुर्द- केव्हीके रस्त्यालगत असलेल्या एका विहिरीत पाण्यावर मृतदेह तरंगताना नातेवाइकांना नजरेस पडला. ही माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. विहिरीतून मृतदेह बाहेर काढल्यानंतर तो प्रतिक्षा मेमाणे हिचाच असल्याचे स्पष्ट झाले.
पोलिसांनी या घटनेची प्रथमदर्शनी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली असून, आत्महत्येमागील नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस हवालदार सय्यद करत आहेत.









