संपादक – गणेश जाधव, प्रतिनिधी – रोहित माने
आंबेगाव (लोणी) : अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर यश मिळवता येते, हे लोणी (ता. आंबेगाव) येथील मोहिनी मारुती सुरवसे हिने सिद्ध करून दाखवले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेतल्या जाणाऱ्या परीक्षेत ती महसूल सहाय्यकपदी निवड झाली असून, तिच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मोहिनीचे वडील मारुती सुरवसे आणि आई सुरेखा सुरवसे गेली ३० वर्षे खडी फोडणे आणि मजुरीचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. स्वतःची जागा नसल्याने हे कुटुंब भाड्याच्या छोट्याशा खोलीत राहते. अशा अत्यंत कठीण परिस्थितीतही मोहिनीने हार न मानता स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू ठेवला आणि अखेर यश मिळवले.
मोहिनीने प्राथमिक व माध्यमिक शिक्षण लोणी येथे पूर्ण केले, तर पदवीचे शिक्षण राजगुरुनगर येथील हुतात्मा राजगुरू महाविद्यालयातून घेतले. सन २०२४ मध्ये झालेल्या महसूल सहाय्यक परीक्षेत तिने उल्लेखनीय यश संपादन केले.
मोहिनीच्या यशामागे तिच्या कुटुंबाचा संघर्षही तितकाच प्रेरणादायी आहे. तिचा भाऊ करण हा पोस्टमास्तर म्हणून काम करत शिक्षण घेत आहे, तर बहीण पायल दररोज सुमारे सहा तासांचा प्रवास करून पुण्यात अभियांत्रिकी शिक्षण घेत आहे.
मोहिनीच्या या यशाबद्दल महसूल विभागाचे सहसचिव डॉ. कैलास गायकवाड, चेतन लोखंडे तसेच पंचायत समिती सदस्य अंकिता वाळुंज यांनी तिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.






