मुंबई–पुणे ‘मिसिंग लिंक’ 1 मेपासून सुरू! प्रवास होणार अधिक जलद


संपादक – गणेश जाधव, प्रतिनिधी – रोहित माने

ता.30 – मुंबई आणि पुणे या दोन महत्त्वाच्या शहरांमधील प्रवास अधिक जलद आणि सुलभ करणारा बहुप्रतिक्षित यशवंतराव चव्हाण मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प अखेर पूर्ण झाला असून, हा मार्ग 1 मे 2026 पासून सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे घाटातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार असून प्रवासाचा वेळही लक्षणीयरीत्या कमी होणार आहे.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) आणि वाहतूक पोलीस प्रशासनाने या नव्या मार्गावरील वाहतूक टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) प्रवीण साळुंखे यांनी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेनुसार 1 मे 2026 ते 31 मे 2026 या कालावधीत केवळ हलकी मोटार वाहने, बस आणि इतर प्रवासी वाहनांनाच या मार्गावरून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. या कालावधीत मालवाहू वाहनांना या मार्गावर पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे.

त्यानंतर 1 जून 2026 पासून दुसऱ्या टप्प्यात हलकी वाहने आणि बससाठी हा मार्ग सुरूच राहणार असून मालवाहू वाहनांना प्रवेश द्यायचा की नाही, याबाबतचा अंतिम निर्णय सुरुवातीच्या सहा महिन्यांच्या निरीक्षणानंतर घेतला जाणार आहे. दरम्यान, सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने काही कडक निर्बंध लागू केले आहेत. विशेषतः ज्वलनशील, स्फोटक किंवा इतर धोकादायक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या ‘हॅझमॅट’ वाहनांना या प्रकल्पातील बोगद्यांमधून प्रवास करण्यास पूर्णपणे मनाई करण्यात आली आहे. अशा वाहनांनी जुन्या द्रुतगती मार्गाचाच वापर करणे अनिवार्य करण्यात आले आहे.

वेगमर्यादेबाबत प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, या मार्गावरील बोगद्यांमध्ये हलक्या वाहनांसाठी ताशी 100 किलोमीटर, तर बस व इतर प्रवासी वाहनांसाठी ताशी 80 किलोमीटर इतकी कमाल वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. निर्धारित वेगमर्यादेच्या 5 टक्क्यांपर्यंतची सवलत देण्यात आली असली, तरी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मोटार वाहन कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येणार आहे.

या नव्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पामुळे मुंबई–पुणे प्रवास अधिक वेगवान होणार असून घाटातील वाहतूक कोंडीपासून मोठा दिलासा मिळणार आहे. प्रशासनाने नागरिकांना वाहतुकीचे नियम पाळण्याचे आवाहन केले असून हा आदेश 1 मे 2026 पासून पुढील आदेशापर्यंत लागू राहणार आहे.


21
कृपया वोट करा

जनसामान्यांचा आवाजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!