बारामती–गाणगापूर एसटी बससेवा सुरू; भाविकांना मोठा दिलासा


संपादक – गणेश जाधव, प्रतिनिधी – रोहित माने

बारामती : बारामतीकरांसाठी एक आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. भाविकांची अनेक दिवसांची मागणी लक्षात घेऊन अखेर बारामती ते गाणगापूर ही थेट एसटी बससेवा सुरू करण्यात आली आहे. राज्य परिवहन मंडळाच्या बारामती आगारामार्फत ही सेवा बुधवार (ता. २९) पासून सुरू करण्यात आली.

गाणगापूर येथे दर पौर्णिमेला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते. या पार्श्वभूमीवर एसटी बससेवा सुरू करण्याची मागणी पंचायत समितीच्या मासिक बैठकीत करण्यात आली होती. या मागणीला प्रतिसाद देत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सूचनेनुसार तसेच पंचायत समितीच्या पाठपुराव्यामुळे ही सेवा कार्यान्वित करण्यात आली.

या बससेवेच्या माध्यमातून बारामतीहून गाणगापूरला जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीस्कर आणि सुरक्षित होणार आहे. खास करून ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी ही सेवा मोठा दिलासा ठरणार आहे.

या बससेवेच्या शुभारंभ प्रसंगी सभापती किरण तावरे, उपसभापती शुभांगी आगवणे, आगार व्यवस्थापक प्रवीण शिंदे, वाहतूक निरीक्षक प्रवीण माळीशिकारे, चालक सरफराज घारी आणि वाहक दत्तात्रेय वाळुंजकर उपस्थित होते.

ही सेवा सुरू झाल्यामुळे बारामतीसह परिसरातील भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण असून, भविष्यातही अशा सुविधा वाढवाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


21
कृपया वोट करा

जनसामान्यांचा आवाजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!