Baramati News : बारामतीत दक्ष नागरिक व पोलिसांच्या सतर्कतेमुळे नवजात अर्भकाचे वाचले प्राण…!


संपादक -गणेश जाधव, उपसंपादक -रोहित माने.

दि. १९ ऑगस्ट २०२६.

बारामती – शहरातील तांदूळवाडी येथील जुन्या रेल्वे पुलाखाली नवजात अर्भक टाकून दिल्याची घटना बुधवारी (ता. १९) सकाळी उघडकीस आली. दक्ष नागरिकांनी बारामती तालुका पोलिसांना तत्काळ माहिती दिल्याने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अर्भकाला ताब्यात घेऊन उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

वेळीच मिळालेल्या मदतीमुळे अर्भकाचे प्राण वाचले असून त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे.

बुधवारी सकाळी सव्वासहा वाजण्याच्या सुमारास तांदूळवाडी येथील जुन्या रेल्वे पुलाखाली नवजात अर्भक रडत असल्याची माहिती दक्ष नागरिकांनी पोलिसांना फोनद्वारे दिली. माहिती मिळताच पोलिस निरीक्षक नारायण पवार यांनी पोलिस कर्मचारी शाहरुख शेख यांना घटनास्थळी जाण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

यावेळी एक नवजात स्त्री अर्भक पुलाखाली आढळून आले. एका जागरूक नागरिकाने अर्भकाला उचलून घेत त्याचे प्राण वाचविण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. पोलिसांनी तातडीने अर्भकाला ताब्यात घेऊन महिला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. सध्या अर्भकावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती सुस्थितीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दरम्यान, अर्भकाचा त्याग करण्याच्या उद्देशाने त्याला टाकून देणाऱ्या अज्ञात महिलेविरुद्ध शाहरुख शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बारामती तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वेळेत पोहोचल्याने अर्भकाचे प्राण वाचले….

दक्ष नागरिकांनी तातडीने पोलिसांनी माहिती दिल्यानंतर पोलिसांनीही तितक्याच तातडीने केलेल्या हालचालीमुळे त्या अर्भकास जीवदान मिळाले. पोलिस घटनास्थळी जाण्यास उशीर झाला असता तर कदाचित अनर्थ घडू शकला असता.


22
कृपया वोट करा

जनसामान्यांचा आवाजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!