बारामती तालुक्यातील दहा गावांमध्ये भारत नेट स्मार्ट व्हिलेज योजना राबविण्यात येणार आहे, अशी माहिती बारामती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी किशोर माने यांनी दिली.
सुपे येथील ग्रामपंचायत सभागृहात गटविकास अधिकारी माने, योजनेच्या अधिकारी स्नेहा गुंड, कुणाल भारवीरकर या अधिकाऱ्यांनी नुकतीच भेट देऊन योजनेची प्राथमिक माहिती ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना दिली. यावेळी पथकाने जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा, अंगणवाड्या, ग्रामीण रुग्णालय, पशुवैद्यकीय दवाखान्याला भेट दिली. या सर्व आस्थापनांना इंटरनेटच्या माध्यमातून एकमेकांना जोडले जाणार आहे. याशिवाय शेती विषयक कामकाज यामध्ये एआय तंत्रज्ञान, ठिबक व तुषार सिंचन, ग्रीन हाऊस, महिलांसाठी प्रशिक्षण व रोजगार निर्मिती आदींबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. याप्रसंगी सरपंच तुषार हिरवे, उपसरपंच शंकर शेंडगे व अन्य सदस्य उपस्थित होते.
या गावांचा समावेश
तालुक्यातील सुपे, मोरगाव, पणदरे, करंजे, वाणेवाडी, मुरूम, गुणवडी, डोर्लेवाडी, पिंपळी, काटेवाडी आदी दहा गावात भारत नेट स्मार्ट व्हिलेज योजना राबवण्यात येणार आहे.







