संपादक – गणेश जाधव, प्रतिनिधी रोहित माने
बारामती – बारामती शहरात एका तरुणाचा अमानुष खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लेंडीपट्टी येथील वेताळबाबा मैदानात मध्यरात्री दगडाने मारहाण करून २० वर्षीय तरुणाचा खून करण्यात आल्याप्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात दोन आरोपींविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणातील मयताचे नाव अविनाश उर्फ माउली धनंजय लोंढे (वय २०) असे असून, फिर्यादी त्याचे वडील धनंजय प्रभाकर लोंढे (वय ४३) आहेत. ते निरा रोड येथील म्हसोबा मंदिराजवळ चहाची हातगाडी चालवतात.
फिर्यादीनुसार, दिनांक १४ डिसेंबर २०२५ रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास, समिर इकबाल शेख (वय २५, व्यवसाय चप्पल दुकान) व प्रथमेश राजेंद्र दळवी (वय २०, व्यवसाय हेल्पर) यांनी संगनमत करून अविनाश यास दगडाने मारहाण केली. अविनाशने शिवीगाळ केल्याच्या कारणावरून त्याच्या डोक्यात दगड मारून गंभीर जखमी करत त्याचा खून करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या घटनेनंतर १५ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ७.१४ वाजता बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ४६०/२०२५ अंतर्गत BNS कलम १०३(१), ३(५) तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार कलम ३(१)(r), ३(२)(v) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्ह्याची नोंद पोलीस हवालदार शेख (बॅज नं. २१२१) यांनी केली असून, पुढील तपास मा. डॉ. सुदर्शन राठोड करत आहेत. घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.









