संपादक – गणेश जाधव, प्रतिनिधी – रोहित माने
बारामती – शहरातील ध्वनीप्रदूषण रोखण्यासाठी आणि नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने बारामती वाहतूक पोलिसांनी मोठी कारवाई राबवली. बेकायदेशीर ‘फटाका’ सायलेंसर लावलेल्या तब्बल १११ बुलेट दुचाकींवर बुलडोझर चालवत सायलेंसर जागेवरच नष्ट करण्यात आले.
अनेक वेळा सूचना देऊनही नियमांचे उल्लंघन सुरूच असल्याने ही कठोर पावले उचलण्यात आली. विशेषतः रात्रीच्या वेळेत गल्ल्यांमधून व मुख्य रस्त्यांवर कर्कश आवाज करत नागरिकांना त्रास देणाऱ्या दुचाकींवर लक्ष केंद्रीत करून तपासणी मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाईही करण्यात आली.
पोलिसांच्या या कारवाईमुळे शहरातील ध्वनीप्रदूषणात घट होण्यास मदत होणार असून, नियम मोडणाऱ्यांना स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. यापूर्वीही अशा प्रकारच्या कारवायांत ५७ वाहनांवर कारवाई करण्यात आली होती. आता एकूण १११ सायलेंसरवर बुलडोझर कारवाई करण्यात आल्याने नियम पाळण्याचे आवाहन अधिक ठाम झाले आहे.
वाहतूक पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, वाहनांमध्ये बेकायदेशीर बदल करू नयेत, ध्वनीप्रदूषण टाळावे आणि वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे. नियम मोडणाऱ्यांवर पुढेही कठोर कारवाई सुरूच राहील, असा इशाराही देण्यात आला आहे.








