संपादक – गणेश जाधव
अयोध्येतील राम मंदिरात धर्मध्वज फडकवला जाणार आहे. हा ध्वजारोहण म्हणजे मंदिराच्या बांधकामाच्या पूर्णतेचे प्रतिक असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तेच श्री राम जन्मभूमी मंदिराच्या शिखरावर भगवा ध्वज फडकावला जाणार आहे.हा धर्मध्वज फडकवणे हे भव्यतेचे प्रतीक मानले जात आहे. या सोहळ्यासाठी संपूर्ण अयोध्यानगरी सजली आहे. तसेच या विशेष सोहळ्यासाठी श्री राम मंदिर ट्रस्टने मोठ्या संख्येने लोकांना आमंत्रित केले आहे. त्यानिमित्त या धर्म ध्वजाचं धार्मिक महत्त्व काय? ते जाणून घेऊया..
ध्वजारोहणासाठी ४४ मिनिटांचा शुभ मुहूर्त
ज्योतिषांच्या मते, आज राम मंदिरात ध्वजारोहण समारंभ अभिजित मुहूर्तावर होईल. यासाठी ४४ मिनिटांचा शुभ मुहूर्त असेल, सकाळी ११:४५ ते दुपारी १२:२९ पर्यंत हा काळ असेल. भगवान राम यांचा जन्म याच अभिजित मुहूर्तावर झाला होता असं म्हणतात, त्यामुळेच आज राम मंदिरात ध्वजारोहण समारंभासाठी हाच शुभ मुहूर्त निवडण्यात आला आहे.
२५ नोव्हेंबर हाच दिवस का निवडण्यात आला?
अयोध्येच्या संतांच्या मते, त्रेता युगात मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी भगवान राम आणि सीतेचा विवाह झाला होता. आज २५ नोव्हेंबर रोजी ती तिथी आहे. त्यामुळेच हा दिवस या शुभ कार्यासाठी निवडण्यात आला.
धर्मध्वजाचं धार्मिक महत्त्व
राम मंदिरात फडकवण्यात येणारा ध्वज हा भगव्या (केशरी) रंगाचा असेल. कारण सनातन परंपरेत, भगवा हा त्याग, शौर्य आणि भक्तीचे प्रतीक मानला जातो. तसेच हा ध्वज २२ फूट लांब आणि ११ फूट रुंद असेल. ध्वजस्तंभ ४२ फूट उंच असेल. तो १६१ फूट उंचीवर फडकवण्यात येईल. ध्वजावर तीन चिन्हे देखील आहेत: सूर्य, ओम आणि कोविदार वृक्ष. सूर्याच्या मध्यभागी ‘ॐ’ लिहिलेले असेल. त्याचबरोबर कोविदार वृक्षाचे चित्रही असेल.
ध्वजावरील पवित्र चिन्हे
भगवान राम सूर्यवंशी होते, त्यामुळे ध्वजावर सूर्याचं चिन्ह आहे. हा सूर्य भगवान श्रीराम यांच्या प्रकाशमानता आणि पराक्रमाचे प्रतीक आहे. तर ॐ ब्रह्मांडातील सर्वात शक्तिशाली आणि पवित्र मंत्र मानला जातो. त्यामुळे ॐ चं चिन्ह त्यावर आहे. याशिवाय कोविदारचे वृक्ष हे ऋषी कश्यप यांनी मंदार आणि पारिजात वृक्षांना एकत्र करून बनवले होते. कोविदार वृक्ष कधीकाळी अयोध्येच्या राजध्वजाचा भाग होता. याच कारणामुळे त्याला भव्य राम मंदिराच्या ध्वजावरही स्थान देण्यात आले. वाल्मिकी रामायणातही त्याचा उल्लेख आढळतो.
वादळ आणि पावसाचा परिणाम नाही
या ध्वजावर दुहेरी-लेपित कृत्रिम थर लावला आहे, ज्यामुळे ओलावा, उष्णता आणि तापमानातील बदलांचा प्रभाव कमी होईल. हा ध्वज पॅराशूट नायलॉन कापडापासून बनवला आहे. ६०किमी प्रति तास वेगाने वारे वाहत असतील तरी त्याला कोणतेही नुकसान होणार नाही. ध्वजस्तंभ ३६० अंश फिरवता येईल अशा प्रकारे डिझाइन केलेला आहे. जेणेकरून वाऱ्याची दिशा बदलल्यावर ते सहजपणे फिरेल आणि खराब होणार नाही









