संपादक- गणेश जाधव, उपसंपादक -रोहित माने.
दि.१० सप्टेंबर २०२६.
बारामती – पतीकडून इच्छेविरुद्ध अनैसर्गिक शारीरिक संबंधासाठी जबरदस्ती तसेच पती आणि सासूकडून होणाऱ्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून १९ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन जीवन संपविल्याची घटना रूई (ता.बारामती) येथे घडली. याप्रकरणी बारामती तालुका पोलिसांनी पती व सासूविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सुजल माऊली ननवरे (वय १९ वर्षे २ महिने) असे मृत विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी तिचे वडील दीपक हरिभाऊ रासकर (वय-४५, रा. निर्मलनगर, तपोवन रोड, सावेडी, अहिल्यानगर) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुजल ही रूई येथे पतीच्या घरी राहत होती. तिचा पती माऊली नामदेव ननवरे आणि सासू बायडाबाई नामदेव ननवरे यांनी तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. तसेच पती माऊली ननवरे याने तिच्या इच्छेविरुद्ध अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
या त्रासामुळे सुजलचे जगणे असह्य झाले आणि तिने गळफास घेऊन जीवन संपविले. या प्रकरणी माऊली ननवरे व बायडाबाई ननवरे यांच्याविरुद्ध बारामती तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.








