संपादक -गणेश जाधव, उपसंपादक -रोहित माने.
दि.११ सप्टेंबर २०२६.
छत्रपती संभाजीनगर – राज्याचे विद्यमान बहुजन कल्याणमंत्री अतुल सावे यांचे बंधू व पुतण्याला गुरुवारी दुपारी मारहाण झाली. यामध्ये पुतण्या गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती सावे यांच्या निकटवर्तीयांकडून मिळाली.
अजित मोरेश्वर सावे व अमेय अजित सावे (वय ३५), अशी जखमींची नावे आहेत. अजित हे बंधू तर अमेय हे मंत्री सावे यांचे पुतणे आहेत.
पैठण तालुक्यातील बिडकीन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नायगाव खंडेवाडी शिवारात शेतरस्त्याच्या हद्दीवरून निर्माण झालेल्या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले.
या घटनेत राज्याचे मंत्री अतुल सावे यांचे बंधू अजित मोरेश्वर सावे (वय ७०) व पुतणे अमेय अजित सावे (वय ३५) यांना मारहाण झाली आहे. अमेय सावे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, त्यांना आठ टाके पडले आहेत. पुढील उपचारासाठी त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. सावे कुटुंबीयांची या परिसरात शेतजमीन आहे. या जमिनीलगत पूर्वीपासून वहीवाटीचा शेतरस्ता असून, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत या मार्गाचे सिमेंट काँक्रिट रस्त्यात रूपांतर करण्यात आले आहे. रस्त्याची रुंदी आणि रस्त्यालगतच्या जमिनीच्या वापरावरून स्थानिक शेतकरी व संबंधितांमध्ये काही दिवसांपासून वाद सुरू असल्याची माहिती आहे.
गुरुवारी शेतरस्त्याच्या ठिकाणी काही काम सुरू असताना रस्त्याच्या हद्दीवरून वादाला सुरुवात झाली. त्यानंतर वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेच्या वेळी अजित सावे, अमेय सावे यांच्यासह त्यांचे काही कामगार व सहकारी घटनास्थळी उपस्थित असल्याची प्राथमिक माहिती आहे. या हाणामारीत अमेय सावे यांच्या डोक्याला तसेच डोळ्यालगत गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने बिडकीन ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. डोक्यावरील जखमेवर आठ टाके पडल्याची माहिती आहे.
प्रकृती लक्षात घेऊन पुढील उपचारासाठी त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. अजित सावे यांच्यावरही बिडकीन ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच बिडकीन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी नायगाव खंडेवाडी येथे पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. घटनेनंतर मारहाणीत सहभागी असल्याचा संशय असलेल्या व्यक्तींचा पोलिसांकडून शोध सुरू असल्याची माहिती आहे.
दरम्यान, या घटनेनंतर नायगाव खंडेवाडी या छोट्याशा गावात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांकडून जखमींचे जबाब तसेच घटनेची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. संबंधितांकडून तक्रार प्राप्त झाल्याचे समजते; मात्र वृत्त लिहितेपर्यंत या प्रकरणात कोणता गुन्हा दाखल करण्यात आला आहे, याबाबत अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नव्हती. पोलिसांकडून घटनास्थळावरील परिस्थिती, जबाब व उपलब्ध पुराव्यांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.








