संपादक -गणेश जाधव, उपसंपादक -रोहित माने.
दि.१२ सप्टेंबर २०२६.
दीपक पडकर, बारामती : घरगुती कारणांमुळे आई-वडिलांसोबत न राहता मैत्रिणीकडे जात असल्याचे सांगून घराबाहेर पडलेली तरुणी अखेर सुरक्षितपणे घरी परतली आहे. बारामती शहर पोलिसांच्या विशेष मिसिंग पथकाने तिचा शोध घेतला.
नंतर महिला पोलिसांनी विश्वासात घेऊन केलेल्या संवेदनशील समुपदेशनातून तिच्या आयुष्यातील काही गंभीर बाबी समोर आल्या. तरुणीला कुटुंबापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि तिच्या वैयक्तिक छायाचित्रांचा गैरवापर करण्याची धमकी दिल्याचे तिच्या बोलण्यातून स्पष्ट झाले. पोलिसांच्या सतर्कतेमुळे तिचा घेतला जाऊ शकणारा संभाव्य गैरफायदा वेळीच लक्षात आला.
बारामती शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेपत्ता तरुणीची तक्रार १० सप्टेंबर रोजी नोंद झाल्यानंतर विशेष पथकाने तातडीने शोध सुरू केला. उपलब्ध तांत्रिक व मानवी माहितीच्या आधारे तरुणीचा शोध घेण्यात आला. मात्र, तिची सुरक्षितता आणि घर सोडण्यामागील कारणे समजून घेणे हे पोलिसांसमोरील पुढचे आव्हान होते.
तरुणीचा धक्कादायक उलगडा
मिसिंग पथकातील महिला पोलिस हवालदार मोनिका मोहिते व ज्योती डिसले यांनी तरुणीवर कोणताही दबाव न आणता संवाद साधला. या वेळी कुटुंबीयांच्या ओळखीतील एका व्यक्तीने जवळीक वाढवून स्वतंत्र मोबाईल दिला. फोन व व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क ठेवून विश्वास संपादन केल्यानंतर वैयक्तिक छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी दिल्याचे तरुणीने सांगितले. या परिस्थितीतून बाहेर पडण्यास मदत करण्याच्या निमित्ताने सामाजिक संघटनेचा पदाधिकारी असल्याचे सांगणाऱ्या दुसऱ्या एका तरुणाने तिच्याशी संपर्क वाढविला. मदत व संरक्षणाचे आश्वासन देत त्याने प्रेम व्यक्त करून लग्नाचे आश्वासन दिल्याचेही तरुणीने चौकशीत सांगितले.
ओळखीतील तरुणाचा दबाव
तरुणीला स्वतंत्र खोलीत राहण्याची व्यवस्था करून आई-वडिलांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. संबंधित तरुणाने तिच्या आई-वडील व नातेवाईकांविरोधात, त्यांच्यापासून धोका असल्याच्या आशयाचा अर्ज तयार केल्याची बाबही समोर आली. हा अर्ज पोलिस ठाण्यात सादर करण्याची तयारी असल्याचे तपासात आढळले.
प्रभारी पोलिस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांनी या प्रकरणात घाईघाईने निष्कर्ष न काढता वस्तुस्थिती पडताळण्यावर भर दिला. महिला पोलिस, सामाजिक क्षेत्रातील जबाबदार व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक व विधिज्ञ यांच्या उपस्थितीत तरुणीची बाजू स्वतंत्रपणे समजून घेण्यात आली. संबंधित व्यक्तीकडूनही स्पष्टीकरण घेण्यात आले. उपलब्ध माहिती व जबाबाच्या आधारे पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी आवश्यक नोंदी करण्यात आल्या आहेत.
सुरक्षिततेचा निर्णय तरुणीचाच…
पोलिसांनी तरुणीवर कोणताही निर्णय लादला नाही. घराबाहेर अनोळखी अथवा असुरक्षित ठिकाणी राहण्याचे संभाव्य धोके समजावून सांगत तिला उपलब्ध सुरक्षित पर्यायांची माहिती देण्यात आली. तिच्या आई-वडिलांशीही स्वतंत्र चर्चा करून मुलीशी संयमाने वागण्याची आणि तिच्यावर दबाव न आणण्याची सूचना करण्यात आली. दीर्घ संवादानंतर तरुणीने स्वतःच्या इच्छेने आई-वडिलांसोबत घरी जाण्याचा निर्णय घेतला.
अनेक तास चिंतेत असलेल्या पालकांनी मुलीला सुरक्षित पाहिल्यानंतर सुटकेचा नि:श्वास सोडला. आईच्या मिठीत विसावलेली मुलगी आणि पालकांच्या चेहऱ्यावर परतलेले समाधान हा या प्रकरणातील सर्वांत भावनिक क्षण ठरला.
मिसिंग व्यक्तीचा शोध लागल्यानंतर प्रकरण संपत नाही. त्या व्यक्तीच्या निर्णयामागे दबाव, फसवणूक किंवा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न आहे का, याची पडताळणी करणे तितकेच महत्त्वाचे ठरते. या प्रकरणात महिला पोलिसांनी विश्वासाचे वातावरण निर्माण करून तरुणीची बाजू समजून घेतली. त्यामुळे संभाव्य गंभीर प्रकाराची माहिती वेळीच समोर आली आणि तरुणीला सुरक्षित वातावरणात परतण्याचा मार्ग मिळाला.








