बारामती नगरपालिका निवडणुकीत अपेक्षेपेक्षा कमी मतदान.. ६७ टक्के मतदान


संपादक – गणेश जाधव, प्रतिनिधी – रोहित माने

बारामती – बारामती नगरपालिका निवडणुकीसाठी २० डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. प्रशासनाने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, या निवडणुकीत एकूण ६६.९२ टक्के मतदान झाले असून, ही टक्केवारी राजकीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

मतदानाच्या या टक्केवारीमुळे कोणत्या पक्षाला फायदा होणार, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.

एकूण मतदानामध्ये ३४,२३३ पुरुष मतदार, ३४,०१२ महिला मतदार, तसेच ३ इतर मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. एकूण ६८२४८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. पुरुष आणि महिला मतदारांचे प्रमाण जवळपास समान असल्याने, यावेळी महिला मतदारांचा सहभाग मोठ्या प्रमाणात झाल्याचे चित्र दिसून आले.

या निवडणुकीत अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पार्टी, वंचित बहुजन आघाडी, बहुजन समाज पार्टी, इतर छोटे पक्ष तसेच अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात होते. त्यामुळे ही निवडणूक बहुपक्षीय आणि अत्यंत चुरशीची ठरली आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे, बारामती नगरपालिका निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आठ उमेदवार आधीच बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे उर्वरित ३३ नगरसेवक पदांसाठी आणि नगराध्यक्ष पदासाठीच प्रत्यक्ष मतदान झाले असून, त्यासाठीची ही मतदानाची आकडेवारी समोर आली आहे.

काही प्रभागांमध्ये अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळत असून, विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीचा फायदा विरोधकांना होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही प्रभागांत थेट लढत, तर काही ठिकाणी त्रिकोणी व चौरंगी लढती झाल्याने निकालाबाबत उत्सुकता वाढली आहे.

ही मतदानाची टक्केवारी ही सत्ताधाऱ्यांसाठी लाभदायक ठरणार की, विरोधकांसाठी संधी ठरणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मतदारांनी स्थानिक प्रश्न, विकासकामे आणि नेतृत्वावर किती विश्वास दाखवला आहे, याचे खरे चित्र उद्या जाहीर होणाऱ्या निकालातूनच समोर येणार आहे. त्यामुळे संपूर्ण बारामतीसह राज्याचे लक्ष या निकालाकडे लागले आहे.


22
कृपया वोट करा

जनसामान्यांचा आवाजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!