एबी फॉर्म गहाळ प्रकरणी हनुमंत पाटील यांच्यावर कारवाई, पिंपरी-चिंचवड निवडणूक प्रक्रियेत खळबळ


संपादक – गणेश जाधव, प्रतिनिधी – रोहित माने

पुणे – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील निवडणूक प्रक्रियेत प्रशासनाच्या गहाळ आणि निष्काळजी कारभाराचं एक धक्कादायक उदाहरण समोर आलं आहे. एका प्रमुख राजकीय पक्षाच्या अधिकृत उमेदवाराचा एबी फॉर्म चक्क निवडणूक कार्यालयातून गहाळ झाल्याने खळबळ उडाली आहे. या गंभीर प्रकाराची दखल घेत अखेर संबंधित निवडणूक अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १६ मध्ये हा सगळा प्रकार घडला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या अधिकृत उमेदवार जयश्री भोंडवे यांनी आपला उमेदवारी अर्ज पक्षाच्या अधिकृत एबी फॉर्मसह वेळेत दाखल केला होता. मात्र उमेदवारी अर्जाच्या छाननीदरम्यान निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी भोंडवे यांचा एबी फॉर्म गहाळ झाल्याचं कारण पुढे करत त्यांना थेट अपक्ष उमेदवार म्हणून घोषित केलं.

या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली. अखेर या प्रकरणाची गंभीर दखल घेत प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. निवडणूक अधिकारी हनुमंत पाटील यांच्याकडून तात्काळ कामकाज काढून घेण्यात आले असून त्यांच्या जागी उपजिल्हाधिकारी अर्चना तांबे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, हनुमंत पाटील हे यापूर्वी महाराष्ट्रातील बारामती, कुरकुंभ, जेजुरी, फलटण अशा अनेक औद्योगिक वसाहतींमधील एमआयडीसी भूखंड वाटपाच्या कामकाजात कार्यरत होते. तसेच माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे माजी पीए आणि त्यांच्या विश्वासातील अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती. अशा परिस्थितीत अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराचाच एबी फॉर्म निवडणूक कार्यालयातून गायब होणं, हे अनेक प्रश्न उपस्थित करणारे ठरत आहे.

या प्रकरणामुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून, पुढील चौकशीत नेमकं सत्य काय आहे हे स्पष्ट होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


22
कृपया वोट करा

जनसामान्यांचा आवाजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!