संपादक – गणेश जाधव, प्रतिनिधी – रोहित माने
बारामती – बारामतीतील कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने आयोजित भव्य कृषी प्रदर्शनाचा आज शेवटचा दिवस असून, या प्रदर्शनाला खासदार सुनेत्रा पवार यांनी खास भेट दिली.
विशेष म्हणजे, त्या आपल्या नव्या सूनबाई ऋतुजा पवार यांच्यासोबत प्रदर्शनाची पाहणी करताना दिसून आल्या. जय पवार यांच्या विवाहानंतर प्रथमच सार्वजनिक कार्यक्रमात सासू-सून एकत्र दिसल्याने उपस्थितांचे लक्ष वेधले गेले.
अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती यांच्या माध्यमातून भरवले जाणारे हे कृषी प्रदर्शन तब्बल १७० एकर क्षेत्रावर आयोजित करण्यात आले आहे. गेल्या दहा वर्षांपासून सातत्याने आयोजित होणाऱ्या या प्रदर्शनाचे यंदा ११ वे वर्ष असून, ते देशातीलच नव्हे तर जगातील सर्वात मोठ्या प्रात्यक्षिकांवर आधारित कृषी प्रदर्शनांपैकी एक मानले जाते. यंदा १७ ते २४ जानेवारी २०२६ या कालावधीत आठ दिवस हे प्रदर्शन भरवण्यात आले.
या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य म्हणजे शेतीतील नव्या तंत्रज्ञानाची प्रत्यक्ष प्रात्यक्षिके. परदेशातील अधिक उत्पादन देणारी बियाणे, रोपे, आधुनिक सिंचन पद्धती, कृषी यांत्रिकीकरण आणि शाश्वत शेतीसाठी उपयुक्त प्रयोग शेतकऱ्यांना प्रत्यक्ष पाहता येतात. ‘याची देही याची डोळा’ या तत्त्वावर आधारित हे प्रदर्शन शेतकऱ्यांना भविष्यातील शेतीसाठी दिशा देणारे ठरत आहे.
दरवर्षी अडीच ते तीन लाख शेतकरी या प्रदर्शनाला भेट देतात. यंदा ही संख्या आणखी वाढेल, असा अंदाज असल्याने गर्दी टाळून शेतकऱ्यांना सविस्तर माहिती घेता यावी, या उद्देशाने प्रदर्शनाची कालमर्यादा वाढवण्यात आली, अशी माहिती ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार यांनी दिली.
पाहणीदरम्यान सुनेत्रा पवार यांनी अधिकाऱ्यांकडून विविध प्रकल्पांची माहिती घेतली. प्रदर्शनातील मांडणी, प्रयोग आणि शेतकऱ्यांचा उत्साह पाहून त्या भारावून गेल्या. त्यांनी स्वतःच्या मोबाईलमध्ये फोटोही टिपले. नव्या सूनबाईसोबत त्यांनी दिलेली ही भेट केवळ कौटुंबिक क्षण न राहता, शेती आणि शेतकऱ्यांप्रती असलेल्या बांधिलकीचेही प्रतीक ठरली.









