बारामती विमानतळावर ‘नाइट लँडिंग’ सुविधा


बारामती विमानतळावर ‌’नाइट लँडिंग‌’ सुविधेची घोषणा अर्थसंकल्पात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. परिणामी, आता बारामती विमानतळाचा विकास होण्याची चिन्हे आहेत.

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनानंतर हे विमानतळ देशभर कमालीचे चर्चेत आले आहे.बारामती एमआयडीसीनजीक गोजूबावी गावच्या हद्दीत हे विमानतळ आहे. सध्या या विमानतळाचा ताबा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे आहे. बारामतीचे विमानतळ छोटे असून, तेथे टर्मिनल इमारत, दोन एप्रन व टॅक्सी-वे एवढ्याच सुविधा आहेत.

या विमानतळाला एअर ट्राफिक कंट्रोल नाही. नेव्हिगेशन सिस्टिम व नाइट लँडिंगची येथे कमतरता होती. अजित पवार यांनी विमानतळ विकासाचा मानस अनेकदा बोलून दाखविला होता. पुण्यातील विमानतळ संरक्षण दलाचे आहे.

त्यामुळे पुरंदरला आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि बारामती विमानतळावर ‌’नाइट लँडिंग‌’ ही कामे प्राधान्याने केली जाणार असल्याचे ते म्हणाले होते. आता त्यांच्या पश्चात अर्थसंकल्पात याबाबतची घोषणा झाली आहे. बारामती विमानतळावर ‌’नाइट लँडिंग‌’ची सुविधा निर्माण झाल्यास 24 तास विमानांची ये-जा होऊ शकेल.

यामुळे कारखानदारी वाढण्यास मदत होणार आहे. साहजिकच, या परिसरात गुंतवणूक वाढून रोजगारनिर्मितीला चालना मिळेल, कारखानदारी वाढेल. बारामतीतून रोज मुंबईसाठी विमान सेवा सुरू करावी, अशी मागणी वारंवार उद्योजक, व्यापारी वर्गाकडून होत आहे. या मागणीलाही चालना मिळू शकेल.


21
कृपया वोट करा

जनसामान्यांचा आवाजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!