संपादक – गणेश जाधव, प्रतिनिधी – रोहित माने
बुलढाणा – (ता.26)बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात लग्नातील आनंदोत्सवाला गालबोट लावणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट हत्येत झाल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शोएब खान अमीन खान (वय २३, रा. बर्डे प्लॉट, खामगाव) हा तरुण लग्न समारंभात सहभागी झाला होता. बर्डे प्लॉट परिसरातील स्मशानभूमीजवळ हा विवाह सोहळा सुरू होता. डीजेच्या तालावर तरुणांचा जल्लोष सुरू असताना नाचताना शोएबचा धक्का चुकून दुसऱ्या एका तरुणाला लागला.
या किरकोळ धक्क्यावरून दोघांमध्ये सुरुवातीला शाब्दिक वाद झाला. मात्र, काही वेळातच हा वाद चिघळला आणि त्याने हिंसक रूप धारण केले. परिसरातील ४ ते ५ जणांनी एकत्र येत शोएबवर धारदार शस्त्र आणि ‘फायटर’ने हल्ला चढवला. हा हल्ला अत्यंत भीषण होता. गंभीर जखमी झालेल्या शोएबचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
या घटनेनंतर बर्डे प्लॉट परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच खामगाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
या प्रकरणी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, हल्लेखोर आरोपी फरार झाले आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष तपास पथके रवाना करण्यात आली आहेत. ही घटना पुन्हा एकदा दाखवून देते की, क्षुल्लक कारणावरून होणारे वाद किती भयंकर परिणाम घडवू शकतात.








