“माझ्याकडे फक्त तीनच पर्याय होते” राघव चड्ढा यांचा खुलासा; ‘आप’ सोडून भाजपात जाण्यामागचं कारण स्पष्ट


संपादक – गणेश जाधव, प्रतिनिधी – रोहित माने

काही दिवसांपासून आम आदमी पक्ष मध्ये सुरू असलेल्या घडामोडींना आता नवं वळण मिळालं आहे. पक्षाचे राज्यसभेतील खासदार राघव चड्ढा यांच्यासह सात खासदारांनी २४ एप्रिल रोजी भारतीय जनता पक्ष मध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर काही वेळातच राघव चड्ढा, संदीप पाठक आणि अशोक मित्तल यांनी भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या उपस्थितीत अधिकृतरित्या पक्षप्रवेश केला.

दरम्यान, राघव चड्ढा यांच्यासह ‘आप’च्या या सात खासदारांनी आम आदमी पक्ष का सोडला आणि भाजपात जाण्याचा निर्णय का घेतला? यावरून अनेक उलटसुलट चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. या चर्चांवर आता खासदार राघव चड्ढा यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत सविस्तर भाष्य केलं. आम आदमी पक्ष सोडण्यामागची कारणं आणि भाजपात प्रवेश करण्याची कारणं खासदार राघव चड्ढा यांनी सांगितली आहेत.

 

राघव चड्ढा यांनी काय म्हटलं?

“गेल्या तीन दिवसांपासून मला अनेकांचे फोन, मेसेज आले. अनेकांनी मला शुभेच्छा दिल्या, तर काही जणांना माझ्या या निर्णयाच्या मागचं कारण जाणून घ्यायचं आहे. त्यामुळे हा व्हिडीओ त्या सर्वांसाठीच आहे. राजकारणात येण्याआधी मी एक चार्टर्ड अकाउंटंट होतो. माझ्या समोर एक चांगलं करिअर होतं, तरीही मी माझं करिअर सोडलं आणि राजकारणात येण्याचा निर्णय घेतला. मात्र, मी माझं करिअर करण्यासाठी राजकारणात आलेलो नाही”, असं राघव चड्ढा यांनी म्हटलं आहे.

“मी एका (आम आदमी पक्ष) पक्षाचा सदस्य झालो. त्यानंतर त्या पक्षाला मी माझ्या आयुष्यातील १५ वर्ष दिले. मात्र, आजच्या घडीला आम आदमी पक्ष हा जुना आम आदमी पक्ष राहिलेला नाही. या पक्षात एक टॉक्सिक वातावरण निर्माण झालेलं आहे. काम करण्यापासून रोखलं जात आहे, संसदेत बोलण्यापासून रोखलं जात आहे, आज आम आदमी पक्ष हा भ्रष्टाचारी लोकांच्या हातात गेला आहे, जे लोक देशासाठी नाही, तर स्वत:च्या फायद्यासाठी काम करत आहेत”, अशी टीका राघव चड्ढा यांनी केली.

 

‘माझ्यासमोर तीनच पर्याय होते’ : राघव चड्ढा

 

“गेल्याकाही वर्षांपासून मला असं वाटत होतं की ‘राईट मॅन इन राँग पार्टी’. मी चुकीच्या पक्षात आहे. त्यामुळे माझ्यासमोर फक्त तीनच पर्याय होते. त्यातील पहिला पर्याय होता की, मी राजकारण सोडावं, दुसरा पर्याय होता की, मी याच पक्षात राहून पक्षातील काही गोष्टी ठीक करण्यासाठी प्रयत्न करावेत. पण ते काही झालं नाही. त्यानंतर माझ्यासमोर तिसरा पर्याय होता की, मी माझा अनुभव घेऊन सकारात्मक राजकारण करावं आणि दुसऱ्या पक्षात जाऊन एक सकारात्मक राजकारण करावं. त्यामुळे फक्त मी एकट्याने नाही, तर माझ्यासह एकूण सात सदस्यांनी हा निर्णय घेतला”, असं राघव चड्ढा यांनी सांगितलं आहे.

 


21
कृपया वोट करा

जनसामान्यांचा आवाजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!