संपादक -गणेश जाधव, उपसंपादक -रोहित माने.
दि.३ सप्टेंबर २०२६.
MPSC Paper Leak: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक भरती परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली. संपूर्ण राज्यात सातवा क्रमांक मिळवणारी उमेदवार ऋतुजा पाटील हिला गुन्हे शाखेने नंदुरबार येथून अटक केली आहे.
न्यायालयासमोर हजर केले असता तिला ५ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
जाणीवपूर्वक १० चुकीची उत्तरे अन् फुटले भांडे
गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, २२ मार्च रोजी पार पडलेल्या औषध निरीक्षक (गट-ब) चाळणी परीक्षेची प्रश्नपत्रिका परीक्षेच्या आधीच ऋतुजा पाटील हिच्याकडे पोहोचली होती. कोणालाही संशय येऊ नये यासाठी पेपर फोडणाऱ्यांनी तिला जाणीवपूर्वक १० प्रश्नांची चुकीची उत्तरे देण्याची सक्त ताकीद दिली होती. असे असूनही तिने संपूर्ण महाराष्ट्रात ७ वा क्रमांक मिळवला. १० प्रश्नांच्या याच संशयास्पद चुकीच्या उत्तरांमुळे प्रश्नपत्रिका फुटीचे संपूर्ण प्रकरण उघडे पडले आणि ऋतुजा पोलिसांच्या जाळ्यात अडकली.
पुरावा नष्ट करण्यासाठी लॅपटॉप खाडीत फेकला
तपासादरम्यान अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी आणि एमपीएससीचा अधिकारी विश्वेश्वर नकाते याने या गुन्ह्यात वापरलेला लॅपटॉप पुरावा नष्ट करण्यासाठी थेट खाडीत फेकून दिला होता. याच लॅपटॉपवर नकाते याने परीक्षेचे २९४ प्रश्न आणि त्यांची उत्तरे लिहून ठेवली होती असा दावा पोलिसांनी केला. पोलिसांनी खाडीतून हा लॅपटॉप शोधून काढला असून त्यातील माहिती रिकव्हर करण्याचे काम सुरू असल्याची माहिती कोर्टाला. याशिवाय, नंदुरबार येथील कौटिल्य क्लासेसचा चालक आणि आरोपी प्रवीण पाटील याच्या घरातून महत्त्वाची कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत.
एमपीएससीचे तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना अटक
या गैरव्यवहारात एमपीएससीच्या अधिकाऱ्यांचा थेट सहभाग असल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी आतापर्यंत आयोगातील विश्वेश्वर दत्तात्रेय नकाते, गोपाल भट्टू मराठे, अभिजित गणपतराव लेंदवे या तीन अधिकाऱ्यांना अटक केली आहे. तर ऋतुजा पाटीलसह या प्रकरणात आतापर्यंत एकूण सात जणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
ऋतुजा पाटीलच्या अटकेनंतर आता या गैरव्यवहाराचे जाळे किती मोठे आहे आणि यामध्ये आणखी किती अधिकारी किंवा उमेदवारांचा सहभाग आहे, याचा सखोल तपास मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा करत आहे.









